पुणे : नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने येथे उड्डाणपुलाची उभारणी केली आहे. या उड्डाणपुलाची एक बाजू महापालिकेने वाहतुकीसाठी खुली केली आहे. मात्र, दुसरी बाजू वाहनचालकांसाठी सुुरू करण्यास गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उशीर होत आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी किमान दीड महिन्यांचा काळ लागण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या भवन विभागाने २१ सप्टेंबर २०२१ मध्ये या उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात केली. सुमारे अडीच किलोमीटर लांबीचा हा पूल असून, विठ्ठलवाडी ते फन टाइम चित्रपटगृहादरम्यान उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. या पुलाचे काम नियोजित वेळेच्या सहा महिने आधी पूर्ण झाल्याने दोन महिन्यांपूर्वी, १ मे रोजी पुलाची एक बाजू महापालिकेने उद्घाटन करून वाहतुकीसाठी खुली केली.
उड्डाणपुलाच्या दुसऱ्या बाजूला काही ठिकाणी डांबरीकरण पूर्ण केले आहे, तर काही ठिकाणी रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. या पुलावर मुरूम टाकून रस्ता तयार केला जात होता. पावसामुळे आता हे काम पूर्ण होण्यासाठी किमान एक ते दीड महिन्याचा वेळ लागेल, असे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
उड्डाणपुलाची दुसरी बाजू सुरू झाल्यानंतर वाहनचालकांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे. नियोजित वेळेत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न होता. पुलावरील रस्ता तयार करण्यासाठी मुरूम टाकण्यात आला आहे. पाऊस पडत असल्याने चिखल झाला आहे. त्यामुळे पुढील कामे करण्यास अडचणी येत आहे. हे काम लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.युवराज देशमुख, मुख्य अभियंता, भवन विभाग