पुणे : गणेश चतुर्थी म्हणजे बुधवारपासून (२७ ऑगस्ट) सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होणार असला तरी पेशवेकालीन सरदार मुजुमदार वाड्यात येत्या रविवारपासून (२४ ऑगस्ट) गणेशोत्सव सुरू होत आहे. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला गणरायाची प्रतिष्ठापना होणार असून ऋषीपंचमी म्हणजेच गुरुवारपर्यंत (२८ ऑगस्ट) विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

पुण्यातील शनिवारवाडा परिसरातील कसबा पेठेत सरदार आबासाहेब मुजुमदार वाड्यात १७१४ पासून अव्याहतपणे धार्मिक प्रथापरंपरेनुसार गणेशोत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात येतो. उत्सवाचे यंदा ३११ वे वर्ष आहे, अशी माहिती आबासाहेब मुजुमदार यांच्या नातसून अनुपमा मुजुमदार यांनी दिली.

सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्या वाड्यात

भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते ऋषिपंचमीपर्यंत सरदार मुजुमदार गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यंदा रविवार (२४ ऑगस्ट) ते गुरूवार (28 ऑगस्ट) पर्यंत हा गणेशोत्सव साजरा होईल. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला रविवारी सरदार मुजुमदार वाड्यातील गणेश महलात मयूरासनावर वल्लभेष गणपती स्थानापन्न होईल. नारो नाळकंठ उर्फ आयाबा मुजुमदार यांना १७१४ मध्ये कऱ्हा नदीमध्ये नर्मदेय गणपतीची मूर्ती सापडली. गणरायाची मूर्ती दशभूज असून, पंचधातूची आहे. गणरायाच्या मांडीवर डाव्या बाजूला त्यांची पत्नी वल्लभा बसलेली आहे. म्हणून त्यास वल्लभेष गणपती म्हणतात, असा मूर्तीचा इतिहास अनुपमा मुजुमदार यांनी सांगितला.

भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला रविवारी सकाळी ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत गणरायाची मूर्ती मयूरासनावर स्थानापन्न करून विधिवत प्रतिष्ठापना होईल. दररोज सकाळी सनई वादन असते. सायंकाळी पाच वाजता कल्याणी नामजोशी यांचे प्रवचन होईल. पुंडलिकबुवा हळबे, वासुदेवबुवा बुरसे, सुहासबुवा देशपांडे आणि विकासबुवा दिग्रसकर यांचे कीर्तन होणार आहे. ऋषीपंचमीला गुरुवारी (२८ ऑगस्ट) सुहासबुवा देशपांडे यांचे तीर्थप्रसादाचे कीर्तन होऊन उत्सवाची सांगता होईल. गणरायाच्या मूर्तीवर अक्षता अर्पण करून मूर्ती वाजतगाजत पुन्हा देव्हाऱ्यात नेऊन ठेवली जाते, असे अनुपमा मुजुमदार यांनी सांगितले.