पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी आता पुणे रेसकोर्स हे नवे स्थळ जवळपास निश्चित झाले आहे. येथे सभा झाली, तर या ठिकाणी तब्बल साडेचार दशकांनंतर पंतप्रधानांची सभा होईल. यापूर्वी इंदिरा गांधी पंतप्रधान असताना, त्यांची जानेवारी १९७२ मध्ये आणि नंतर १९७७ मध्ये पुणे रेसकोर्सवर सभा झाली होती.

पंतप्रधानांची पुढील सोमवारी (२९ एप्रिल) पुण्यात सभा होणार आहे. ही सभा आधी स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर नियोजित होती. मात्र, आता स्थळ बदलण्यात येत आहे. पुणे रेसकोर्स हे स्थळ हडपसर भागात बारामती, शिरूर आणि पुणे या तीन लोकसभा मतदारसंघांच्या परिघावर आहे. त्यामुळे या सभेला ‘राजकीय’ महत्त्व प्राप्त झाले आहे.

हेही वाचा – अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात जागा रिक्त राहिल्याचे उघडकीस, झाले काय?

‘जास्तीत जास्त लोकांना बसता येईल, अशा दृष्टीने रेसकोर्सवर सभा घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पोलिसांनीही स. प. महाविद्यालय मैदान किंवा खडकवासला येथील एखाद्या ठिकाणाऐवजी रेसकोर्सच्या स्थळाबाबत सकारत्मकता दर्शवली,’ असे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर मंगळवारी सायंकाळी रेसकोर्सची पाहणीही केली.

हेही वाचा – अजितदादांनी सांगूनही कारवाई नाही! मद्य पार्टी करणाऱ्या डॉक्टरांना घातले पाठीशी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बांगलादेश युद्धानंतरच्या सभेला अभूतपूर्व प्रतिसाद

‘पुणे रेसकोर्सचे मैदान प्रचंड मोठे आहे. या ठिकाणी बांगलादेश युद्ध जिंकल्यानंतर जानेवारी १९७२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची सभा झाली होती. त्याला अभूतपूर्व प्रतिसाद आणि अलोट गर्दी झाली होती. या सभेच्या तयारीत मी स्वत: सक्रिय होतो. युद्ध जिंकल्यानिमित्त त्या वेळी ज्येष्ठ कवी-गीतकार ग. दि. माडगूळकर यांनी एक गीत तयार केले होते. त्याला वसंत देसाई यांनी संगीत दिले होते. फैयाज, वाणी जयराम, जयवंत कुलकर्णी आदींनी ते सभेच्या वेळी सादर केल्याचेही मला स्मरते,’ अशी आठवण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी सांगितली. ‘सन १९७७ च्या निवडणुकीच्या वेळीही इंदिरा गांधी यांची रेसकोर्सवर सभा झाली होती. त्यानंतर या मैदानावर पंतप्रधानांची ही पहिलीच सभा ठरेल,’ असे जाणकार सांगतात.