पुणे : शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची तक्रार महापालिकेकडे करता यावी, यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या ‘पीएमसी रोड मित्र’ ॲपवर पहिल्या दिवशी ४३ तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींची नोंद पथ विभागाच्या संबधित अभियंत्यांनी घेतली असून, त्याचे निवारण केले जाणार असल्याचे पथ विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरातील अनेक रस्त्यांवर ख़ड्डे पडलेले असतात. त्याची तक्रार सर्वसामान्य नागरिकांना महापालिकेकडे करता यावी, यासाठी महापालिकेने हे ॲप सुरू केले आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते मंगळवारी या ॲपचे अनावरण झाले. त्यानंतर बुधवारी ॲपवर खड्ड्यांबाबत ४३ तक्रारी आल्या आहेत. या ॲपवर तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांना खड्डा पडलेल्या जागेचे दोन ते तीन फोटो, व्हिडिओ अपलोड करावे लागतात.

ॲपच्या माध्यमातून करण्यात आलेल्या तक्रारींच्या फोटोंवर जागेचे स्थळ अक्षांश-रेखांश दर्शविण्यात येते. त्यामुळे आलेली तक्रार संबंधित भागातील पथ विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याला परस्पर समजते. त्याची नोंद पथ विभागाच्या मुख्य कार्यालयातदेखील होते. तक्रार आल्यानंतर पथ विभागाच्या संबंधित अभियंत्याला प्रत्यक्ष जागेवर जाऊन खड्डा बुजवून त्याचे फोटो त्या तक्रारीच्या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहेत. त्यानंतर दोन्ही फोटो संबंधित तक्रारदाराला पाहता येणार आहे.

महापालिकेकडे आलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल घेतली जाणार असून, ४८ ते ७२ तासांत काम पूर्ण करुन तक्रार निकाली काढली जाणार आहे. महापालिकेने सुरू केलेल्या ॲपच्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक तक्रारीची नोंद होणार आहे. ही तक्रार कोणत्या अधिकाऱ्याकडे आहे, याची सविस्तर माहिती देखील एसएमएसच्या माध्यमातून संबंधित तक्रारदाला कळविली जाणार आहे. त्यामुळे आलेली प्रत्येक तक्रार सोडविली जाणार असल्याचे पथ विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणार

आतापर्यंत पीएमसी केअर, ई-मेल आणि ‘आपले सरकार’ संकेतस्थळावर नागरिकांना तक्रारी करता येत होत्या. या ठिकाणी तक्रारी नोंदविल्यानंतर त्या महापालिकेकडे हस्तांतरित केल्या जात होत्या. मात्र, त्यावर प्रभावीपणे कारवाई केली जात नव्हती. महापालिकेने तयार केलेल्या ‘पीएमसी रोड मित्र’ या ॲपमुळे नागरिकांना फायदा होणार आहे. हे ॲप नागरिकांना त्यांच्या समस्या नोंदविण्याचा अधिकार तर देईलच, शिवाय यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित होणार आहे.