बेकायदा पिस्तुल बाळगणाऱ्या सराईतांना गुन्हे शाखेने पकडले. त्यांच्याकडून पाच पिस्तुले आणि ११ काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. आकाश प्रकाश जाधव (वय २३, रा. भिलारेवाडी, कात्रज), मुजम्मील हरुण बागवान (रा.श्रीरामपूर, जि. नगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सराईतांच्या हालचालीवर लक्ष ठेवले आहे. परराज्यातून शहरात पिस्तुल विक्रीस पाठविण्यात आली होती. त्या पैकी एक पिस्तुल जाधव याच्याकडे असल्याची माहिती गजानन सोनुने आणि उज्ज्वल मोकाशी यांना मिळाली होती. स्वारगेट परिसरात सापळा लावून पोलिसांनी जाधवला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. जाधव याची चौकशी करण्यात आली. तेव्हा बागवान याच्याकडे पिस्तुल असल्याची माहिती मिळाली.

हेही वाचा : पुणे : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी ३.६७ कोटींची मागणी ; जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राज्य शासनाला अहवाल

बागवानच्या पुण्यातील तसेच श्रीरामपूरमधील घरातून चार पिस्तुल, दहा काडतुसे जप्त करण्यात आली. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील,उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, गजानन सोनुने, उज्वल मोकाशी, निखिल जाधव, मोहसीन शेख, प्रमोद कोकणे, शंकर नेवसे, नागनाथ राख यांनी ही कारवाई केली. बागवानने मध्यप्रदेशातून पिस्तुले विक्रीस आणल्याची माहिती तपासात मिळाली आहे.