पुणे : क्वीन्स गार्डन भागात एका सदनिकेचे कुलूप तोडून तीन लाखांची रोकड, तसेच दागिने असा पावणेपाच लाख रुपयांचा ऐवज चोरून पसार झालेल्या चोरट्याला मुंबईतील सांताक्रुज परिसरातून अटक करण्यात आली.
राजकिरण अनिल जाधव (वय २५, रा. सांतक्रुज, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पुणे स्टेशन परिसरातील क्वीन्स गार्डन येथील एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्याने पावणेपाच लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना १४ नाेव्हेंबर रोजी मध्यरात्री घडली होती. याबाबत एकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडून तपास सुरू करण्यात आला. पोलिसांनी क्वीन्स गार्डन, तसेच पुणे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. चित्रीकरणात संशयित चोरटा दिसून आला होता. चोरटा स्टेशन परिसरातून मोटारीने मुंबईकडे गेल्याची माहिती तपासात मिळाली.
तपासात सराइत चोरटा राजकिरण जाधवने घरफोडीचा गुन्हा केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले. पोलिसांच्या पथकाने वाकोला परिसरातून जाधव याला ताब्यात घेतले. जाधव याच्याविरुद्ध राज्याच्या वेगवेगळ्या भागात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याने आंध्र प्रदेशातही घऱफोडीचे गुन्हे केले आहेत.
अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बागवे, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, अमोल रसाळ, उपनिरीक्षक आदलिंग, कुंभार, चव्हाण, तांबोळी, थोरात, राठोड, शिंदे, लोखंडे, जाधव, मोाकाशी, टकले यांनी ही कामगिरी केली.
पेट्रोल पंपावर दहशत माजविणारे गजाआड
येरवडा भागातील एका पेट्रोल पंपावर दहशत माजविणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. कृष्णा प्रभाकर नाईक (वय २५), अक्षय उर्फ आबा सुदाम जमदाडे (वय २५), अली रफीक शेख (वय २५, तिघे रा. गांधीनगर, येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. १३ नाेव्हेंबर रोजी येरवड्यातील गुंजन चित्रपटगृहाजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरण्यावरुन आरोपी नाईक, जमदाडे, शेख यांनी पंपावरील कामगारांशी वाद घातला. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांवर तीक्ष्ण शस्त्राने वार करून आरोपींनी दहशत माजविली होती.
पोलिसांकडे तक्रार दिल्यास पंपावरील कामगारांना जीवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली होती. याबाबत एका कामगाराने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. आरोपी कल्याणीनगर येथील नदीपात्रात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून तिघांना पकडले.
अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय ठाकर, उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे, पोलीस कर्मचारी शिंदे, कोकणे, वाबळे, सोगे, कांबळे, सुतार यांनी ही कामगिरी केली.
