पुणे : वाहतूक शाखेच्या ३१ विभागातील पोलीस निरीक्षक, तसेच सहायक निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना करण्यात येत आहे. पावसाळ्यात पाणी साचल्यानंतर वाहतूक विस्कळीत होते.
कात्रज, बाणेर, गणेशखिंड रस्ता, तसेच शहरातील वेगवेगळ्या भागांतील वाहतूक कोंडी विचारात घेता वाहतूक शाखेतील ३१ पाेलीस निरीक्षक, सहायक निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहे. वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक ज्या भागात राहायला आहेत. त्या भागात त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
वाहतूक कोंडी, तसेच विस्कळीत झाल्यास संबंधित पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षकांनी त्वरित तेथे पोहचावे, या विचाराने अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. अपघाताची घटना घडल्यास पोलीस निरीक्षकांनी तातडीने घटनास्थळी भेट द्यावी, असे पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
वाहतूक पोलिसांचा जलद प्रतिसाद महत्त्वाचा आहे. वाहनचालकांसह नागरिकांनी कमीत कमी त्रास होईल, यासाठी ३१ विभागांतील पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षकांच्या ते वास्तव्यास असलेल्या जवळच्या वाहतूक विभागात बदली करण्यात आली आहे.
पावसाळ्यात दक्ष राहण्याच्या सूचना
पावसाळ्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाणी साचते, तसेच झाडांच्या फांद्या पडतात. पावसाळ्यात वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटनांमध्ये वाढ होते. पावसाळ्यात वाहतूक पोलिसांनी सतर्क राहून काम करावे, कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांशी महापालिका, तसेच अन्य यंत्रणांच्या संपर्कात राहावे, असे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.