गुन्हा कोणताही असो गुन्हेगाराचा माग काढण्यात योग्य माहितीची साथ मिळावी लागते. त्या माहितीला प्रयत्न आणि मेहनतीची जोड द्यावी लागते. चिकाटीने केलेल्या तपासामुळे अनेक क्लिष्ट गुन्ह्य़ांचा छडा लागतो आणि पोलिसांकडून आरोपी पकडले जातात. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने जाफर इराणी या चोरटय़ाला पकडले आणि साखळीचोरी, घरफोडी, हातचलाखी करून फसवणूक, पोलीस असल्याची बतावणी, वाहनचोरी असे ५१ गुन्हे उघडकीस आणले. जाफरला पकडण्यासाठी पोलिसांनी गेले दीड वर्ष मेहनत घेतली. पुण्यातून पसार झालेला जाफर शहरात येऊन गुन्हे करत होता. प्रत्येक वेळी तो पोलिसांना गुंगारा द्यायचा. पोलिसांनीदेखील त्याचा माग काढणे थांबवले नव्हते आणि पोलिसांच्या चिकाटीमुळे अखेर तो सापडला.

पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या लोणी काळभोर भागात इराणी वस्ती आहे. मूळचे बलुचिस्थान येथील इराणी स्वातंत्र्योत्तर काळापासून देशात स्थायिक आहेत. निर्वासित म्हणून आलेले ही जमात स्वत:ची ओळख इराणी असे सांगते. त्यांची नाळ बलुचिस्थानशी जोडली असली तरी ते आता भारतीय आहेत. देखणे, गोरेपान इराणी रस्त्याच्या कडेला थांबून गॉगलची विक्री करतात. पुण्यातील शिवाजीनगर, लोणी काळभोर भागात तसेच नगर जिल्ह्य़ातील श्रीरामपूर, चाळीसगाव आणि ठाणे जिल्ह्य़ातील कसारा मार्गावर खडोली भागात त्यांची वस्ती आहे. शिक्षणाचा अभाव आणि स्वत:ला जमातीच्या चौकटीत बांधून घेतलेल्या इराणी समुदायाची फारशी प्रगती झालेली नाही. आजमितीला या जमातीतील अनेकजण किरकोळ कामे करून गुजराण करतात. त्यापैकी काहीजणांनी गैरमार्गाने पैसे कमावले आहेत. चोरी, फसवणूक हा अनेकांचा व्यवसाय बनला आहे. जाफर शहाजमान इराणी (वय ३८, रा. पठारे वस्ती, लोणी काळभोर) हा त्यांच्यापैकी एक आहे.

पुणे शहर परिसरात दोन वर्षांपूर्वी साखळी चोरटय़ांनी उच्छाद घातला होता. दिवसाढवळ्या महिलांचे दागिने हिसकावून पसार होणाऱ्या चोरटय़ांनी पोलिसांपुढे आव्हान उभे केले होते. साखळीचोरीच्या गुन्ह्य़ात पोलिसांनी राज्याच्या वेगवेगळ्या भागांतील इराणी चोरटय़ांना पकडले. त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई केली. या कारवाईमुळे अनेक चोरटे सध्या कारागृहात आहेत. त्यामुळे साखळी चोरीच्या गुन्ह्य़ांना अटकाव घालण्यात पोलिसांना बऱ्यापैकी यश आले आहे. लोणी काळभोर भागातील इराणी वस्तीत राहणारा जाफर याने सोळाव्या वर्षांपासूनच गुन्हे करण्यास सुरुवात केली. हातचलाखीचे गुन्हे करण्यात तो वाकबगार मानला जायचा. पुणे, मुंबई तसेच परराज्यात त्याने गुन्हे केले होते. सन २०१३ मध्ये त्याला अटक करण्यात आली होती.

कारागृहातून सुटल्यानंतर त्याने भारतीय इराणी संघ या संघटनेची स्थापना केली आणि त्याने त्याच्या समाजासाठी काम सुरू केले. चोरीमारीच्या व्यवसायापासून फारकत घेतल्याची बतावणी त्याने पोलिसांकडे केली होती. जाफरमध्ये सुधारणा झाल्याचे पाहून पोलिसांनादेखील आश्चर्य वाटले होते. सन २०१५ मध्ये हडपसरमधील कुमार मिडोज सोसायटीच्या भागात एका महिलेचे दागिने हिसकावण्यात आले होते. याच वर्षी पंढरपूर येथील गुरसाळे गावात पेट्रोल पंप मालकाकडील दोन लाखांची रोकड जाफर आणि त्याच्या साथीदाराने लुटून नेली होती.

या गुन्ह्य़ात त्याच्या साथीदाराला पकडण्यात आले होते. तेव्हा जाफरचे नाव पुढे आले. तेव्हापासून जाफर पसार झाला होता.  हडपसर भागात सन २०१५ मध्ये झालेल्या साखळीचोरीत जाफरचा हात असल्याचे निष्पन्न झाले होते. गेले दीड वर्ष पसार असलेला जाफर पुण्यात येऊन साखळीचोरी, पोलीस असल्याची बतावणी, बँकांबाहेर थांबून नागरिकांना गंडवणे, हातचलाखी करून महिलांचे दागिने लांबविणे, घरफोडी, वाहनचोरी अशा प्रकारचे गुन्हे करत होता. पुणे शहरातील वेगवेगळ्या भागातील गुन्ह्य़ांच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांकडून करण्यात आलेले चित्रीकरण पोलिसांकडून पडताळण्यात आले होते. चित्रीकरणात जाफर आणि त्याचा साथीदार आढळून आले होते. गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पथक त्याच्या मार्गावर होते. गेल्या काही महिन्यांपासून लोणी काळभोर भागातील पठारे वस्तीत तो पत्नी आणि मुलांना भेटण्यासाठी यायचा. पोलिसांनी तेथे सापळा लावला होता. मात्र, प्रत्येक वेळी तो पोलिसांना गुंगारा देऊन पसार व्हायचा. उंड्री भागात पोलिसांकडून गस्त घालण्यात येत होती. त्यावेळी इराणी आणि त्याचा साथीदार अमजद रमजान पठाण (वय ३५, सध्या रा. शिवाजीनगर, परळी वैजनाथ, जि. बीड, मूळ रा. जानसट, मुझफ्फरनगर, उत्तर प्रदेश) हे उंड्री भागात येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, माणिक पवार आणि अमजद पठाण यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्यांना पकडले. चौकशीत त्यांनी उंड्रीतील अतुरनगर भागात एका महिलेची सोनसाखळी हिसकावल्याची कबुली दिली. तपासात त्यांनी पुणे शहरात सोनसाखळी चोरी, हातचलाखी करून फसवणूक, वाहनचोरी, घरफोडी असे ५१ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. राज्य तसेच परराज्यात त्यांनी गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. नोटाबंदीनंतर दोन हजारांची नोट सुटी मागण्याच्या बहाण्याने जाफरने पुण्यातील काही व्यावसायिकांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे.

जाफर आणि त्याचा साथीदार पठाण याच्याकडून ५९ लाखांचे सोन्याचे दागिने, चार लाखांचे चांदीचे दागिने, ६६ लाखांची रोकड आणि परकीय चलन, मोटारी, दुचाकी असा एक कोटी चाळीस लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. जाफरने चोरीच्या पैशांतून पुणे-सोलापूर महामार्गावर दीड एकर जमीन खरेदी करून बंगला बांधल्याचे उघडकीस आले आहे.

पोलीस कोठडीत असलेल्या जाफरची चौकशी सुरू आहे. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, सहायक निरीक्षक महादेव वाघमोडे हे अधिकारी हा तपास करत आहेत.