कामाच्या वेळा, बंदोबस्त, गुन्ह्यांच्या तपासात गुंतलेल्या पोलिसांना शारीरिक व्याधींसह मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. गेले वर्षभर पोलिसांचे मानसिक आरोग्य तसेच समस्यांचे निराकरण करण्यासाठी सातत्याने उपक्रम राबविण्यात आल्याने मानसिकदृष्ट्या पोलीस सक्षम झाले आहेत.
पोलिसांच्या कामाच्या वेळा निश्चित नसतात. अन्य शासकीय विभागाच्या तुलनेत पोलिसांचा संपर्क थेट नागरिकांशी असतो. बंदोबस्त, गुन्ह्यांच्या तपासात गुंतलेल्या पोलिसांसाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ‘पुणे पोलीस सायकोलाॅजिकल वेलबिईंग’ उपक्रम राबविला. पुणे पोलीस दलातील कोथरुड, अलंकार, वारजे, उत्तमनगर, दत्तवाडी, सिंहगड रस्ता या सहा पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य जपणे तसेच त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी गेले वर्षभर उपक्रम राबविण्यात येत आहे. जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त १० ते १५ ऑक्टोबरदरम्यान पोलीस ठाण्यांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, असे परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी सांगितले.

हेही वाचा >>>पुणे : मुख्य सचिवांचे लेखी आदेश ; पीक विमा, अतिवृष्टीची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा ; ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल

परिमंडळ तीनमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मानसोपाचार तज्ज्ञ, समुपदेशकांची व्याख्याने आयोजित केली जातात. या उपक्रमासाठी शीतल अस्तित्व, इमिटोकाॅन, विदुला कन्सलटंन्सी या मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी पोलिसांना सहकार्य केले आहे. पोलीस ठाण्यांच्या पातळीवर मनगट आणि मनशक्ती असे उपक्रम राबविण्यात आले आहेत. मनगट उपक्रमाअंतर्गत पोलिसांना जाणवणऱ्या समस्या जाणून घेतल्या जातात. त्यांचे मत लिखित स्वरुपात घेतले जाते. त्यांना प्रश्न विचारण्यात येतात. प्रश्नांची उत्तरे पोलीस कर्मचारी लिहून देतात. त्या आधारे पोलिसांना नेमक्या काय समस्या आहेत, हे जाणून घेतले जाते. त्यानंतर पोलिसांशी संवाद साधला जातो. पोलीस जाणवणाऱ्या समस्या तसेच मानसिक आरोग्य सक्षम करण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा पोलीस ठाण्यांच्या पातळीवर मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशक संवाद साधतात.
जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त पोलीस ठाण्यांच्या पातळीवर पोलिसांसाठी तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. आहारतज्ज्ञांकडून पोलिसांना मागदर्शन करण्यात आले आहे, असे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा >>>पुणे : राज्यात आणखी दोन दिवस पावसाचे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समुपदेशन, मानसोपचार तज्ज्ञांचे मार्गदर्शनामुळे पोलीस मानसिकदृष्ट्या सक्षम झाले आहेत. पुणे पोलिसांच्या परिमंडळ तीनमधील ४५० हून जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मानसिक आरोग्याविषयक समस्या मांडल्या असून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी गेले वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.- पौर्णिमा गायकवाड, पोलीस उपायुक्त, परिमंडळ तीन