पुणे : मद्यपी वाहनचालकांकडून होणारे गंभीर स्वरूपाचे अपघात, तसेच मद्यपी वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यासाठी पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने अत्याधुनिक दहा ‘ब्रेथ ॲनालायजर’ यंत्रे खरेदी केली आहेत. ही यंत्रे इंटरनेटद्वारे वाहतूक पोलिसांचा नियंत्रण कक्ष आणि मुख्य पोलीस नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आली आहेत. या यंत्रांद्वारे मद्यपी वाहनचालकांवर केली जाणारी कारवाई प्रभावी आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.

शहरात गंभीर स्वरूपाच्या अपघातांचे प्रमाण वाढते आहेत. भरधाव वेग, वाहतूक नियमांचे पालन न करणे, तसेच मद्यपान करून वाहन चालविण्यामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी वाहतूूक पोलिसांकडून दहा अत्याधुनिक ब्रेथ ॲनालायजर यंत्रे खरेदी करण्यात आली असून, पुढील आठवड्यापासून या यंत्रांद्वारे मद्यपी चालकांविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष

‘नवीन ब्रेथ ॲनालायजर यंत्रे इंटरनेटने पुणे पोलिसांचा मुख्य नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) आणि वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आली आहेत. या कारवाईवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष राहणार आहे. इंटरनेटद्वारे मुख्य नियंत्रण कक्षाशी ही यंत्रे जोडण्यात आल्याने कारवाई नेमकी कशा पद्धतीने करण्यात आली, याची माहिती त्वरित उपलब्ध होईल. कारवाई अधिक प्रभावी आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे,’ अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली.

‘एखादा वाहनचालक मद्यपान करून वाहन चालवित असल्याचे उघडकीस आल्यानंतर याबाबतचा अहवाल थेट नियंत्रण कक्षात पाठविला जाईल. त्यानंतर संबंधित पोलीस अधिकारी दंडात्मक कारवाई करतील. तपासणीत एखाद्या चालकाने मद्यपान केले नसल्याचे आढळून आल्यास त्याची माहिती नोंदविली जाईल. या यंत्रणेमुळे प्रत्यक्ष कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी वाढणार आहे. कारवाई न केल्यास त्याचे स्पष्टीकरण संबंधित अधिकाऱ्यांना द्यावे लागणार आहे,’ असे त्यांनी नमूद केले.

मद्यपी चालकांवरील कारवाई

वर्ष मद्यपींवरील कारवाई

२०२२ – ३७२
२०२३ – ६१०
२०२४ – ५,२८६
२०२५ – ३,३६२

(२०२५ ची आकडेवारी १५ ऑगस्टपर्यंतची)