पुणे : प्रेमप्रकरणाच्या संशयातून तरुणाला अडवून त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना तळजाई टेकडी परिसरात घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कोयत्याच्या वारांमुळे तरुण जखमी झाला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणानेच याबाबत सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात जखमी झालेला तरुण एका कंपनीत डिलिव्हरी बाॅय म्हणून काम करतो. २८ ऑक्टोबर रोजी त्याच्या मैत्रिणीने त्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तरुण आणि त्याची मैत्रीण दुचाकीवरून फिरायला बाहेर पडले. तळजाई टेकडी परिसरातील सदू शिंदे स्टेडियमजवळ आरोपींनी दुचाकीस्वार तरुण आणि त्याच्या मैत्रिणीला अडवले. त्या वेळी एका आरोपीने त्याच्याकडे विचारणा केली. ‘तू माझ्या बहिणीला संदेश का पाठवितो,’ असा प्रश्न आरोपीने केला. त्यावर, ‘तुझ्या बहिणीचा विवाह झाल्याापासून मी संबंध तोडले आहेत,’ असे तरुणाने आरोपीला सांगितले. तरीही, त्यानंतर आरोपींनी तरुणाशी वाद घालून त्याला शिवीगाळ केली. एका आरोपीने तरुणाला पकडले आणि अन्य साथीदाराने तरुणाच्या डाेक्यात कोयत्याने वार केला.
गंभीर जखमी झालेल्या तरुणाने ससून रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक फौजदार जोशी तपास करत आहेत.
जनता वसाहतीत महिलांमध्ये हाणामारी
पर्वती पायथा परिसरातील जनता वसाहतीत महिलांमध्ये हाणामारीची घटना घडली. वादातून हाणामारी करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पाच महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस शिपाई खराडे यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच महिला जनता वसाहतीत राहायला आहेत. जनता वसाहत परिसरात ३० ऑक्टोबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास किरकोळ कारणावरून महिलांमध्ये वाद झाला. वादातून महिलांमध्ये हाणामारी झाली. रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाकीला धक्का दिल्याने दुचाकीचे नुकसान झाले. आरडओरडा, तसेच शिवीगाळ करून सार्वजनिक शांततेचा भंग करणे, मारामारी केल्याप्रकरणी पाच महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलीस शिपाई खराडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हवालदार शिंदे तपास करत आहेत.
शहरात एकूणच किरकोळ कारणांवरून हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. किरकोळ वादातून वाहनांची तोडफोड करण्याच्या घटना वानवडी आणि विमाननगर भागातील खेसे पार्क परिसरात नुकत्याच घडल्या होत्या.
