पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पुणे शहर आणि जिल्ह्यात बुधवारी (२७ ऑगस्ट) मद्य विक्रीला बंदी (ड्राय डे) घालण्यात आली असताना शहराच्या मध्य भागात उघड दारू विक्री सुरू असल्याचे उघडकीस आले. बुधवारी रात्री खडक पोलिसांच्या पथकाने शुक्रवार पेठेत छापा टाकून देशी, विदेशी दारूचा साठा जप्त केला. या प्रकरणी मटका अड्डाचालक नंदू नाईक याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वैभव विजय डोंगरे (वय २६), गुड्डू कुमार भोलाकुमार कुमार (वय २६) आणि मटका अड्डा चालक नंदू नाईक (रा . सर्व. शुक्रवार पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस कर्मचारी आशिष चव्हाण यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुधवारी रात्री शुक्रवार पेठ परिसरातील शाहू चौकानजीक असलेल्या रोनक बार येथे ही कारवाई करण्यात आली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दारूबंदीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार बुधवारी (२७ ऑगस्ट) संपूर्ण पुणे शहर आणि जिल्ह्यात मद्य विक्रीला बंदी घालण्यात आली होती. मध्य भागात दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी नजर ठेवली होती. त्यानुसार बुधवारी सायंकाळी खडक पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप व्हटकर, पोलीस कर्मचारी आशिष चव्हाण, हर्षल दुडूम, किरण ठवरे, नदाफ, फरांदे, गोरे यांच्यासह पथक गस्तीवर होते. या वेळी शुक्रवार पेठेतील शाहू चौक परिसरात एका उपाहारगृहाच्या पाठीमागील खोलीत बेकायदा दारू विक्री सुरू असल्याची माहिती पोलीस कर्मचारी आशिष चव्हाण यांना मिळाली.
पोलिसांच्या पथकाने छापा टाकून दारू विकणाऱ्या वैभव डोंगरे व गुडुकुमार यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून देशी-विदेशी दारूच्या बाटल्या, रोख रक्कम आणि मोबाइल संच असा एक लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दारुचा साठा नंदू नाईक याच्या सांगण्यावरून दारू विक्री करत असल्याची माहिती डोंगरे आणि कुमार यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी नाईकसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.