पुणे : गहाळ झालेला मोबाइल संच परत मिळेल, याची शाश्वती नसते. पण, शिवाजीनगर पोलिसांनी नागरिकांचे गहाळ झालेले ४१ मोबाइल संच स्वातंत्र्यदिनी परत मिळवून दिल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर उमटली. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त हृषीकेश रावले यांच्या हस्ते तक्रारदारांना मोबाइल संच परत करण्यात आले. गहाळ झालेले मोबाइल संच परत मिळाल्याने तक्रारदारांनी आनंद व्यक्त केला.
मोबाइल संचात महत्त्वाची माहिती, छायाचित्रे असतात. मोबाइल संचाच्या किमतीपेक्षा महत्त्वाची माहिती गहाळ झाल्याने तक्रारदार हळहळ व्यक्त करतात. शिवाजीनगर परिसरातील गर्दीच्या ठिकाणांहून नागरिकांचे मोबाइल संच चोरीला गेले होते, तसेच काहींचे मोबाइल संच गहाळ झाले होते. याप्रकरणी तक्रारदारांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
शिवाजीनगर पोलिसांच्या सायबर पथकाने गहाळ झालेल्या मोबाइल संचांचा शोध घेण्यास सुरुवात केली. गहाळ झालेले मोबाइल संच परराज्यांत वापरण्यात येत असल्याचे तांत्रिक तपासात उघडकीस आले. मोबाइलमध्ये नवीन सिमकार्ड टाकून त्यांचा वापर सुरू होता. पोलिसांनी मोबाइल संचांच्या ‘आयएमईआय’ क्रमांकांवरून तपास केला. तांत्रिक तपास करून ४१ मोबाइल संच शोधून काढले. महागडे मोबाइल संच परत मिळाल्याने तक्रारदारांनी आनंद व्यक्त केला.
परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त रावले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, गुन्हे शाखेचे निरीक्षक धंनजय पिंगळे, उपनिरीक्षक मनिषा वलसे, पोलीस कर्मचारी नलिनी क्षीरसागर, आदेश चलवादी, तेजस चोपडे, नवनाथ आटोळे यांनी ही कामगिरी केली.
मोबाइल हरविल्यास तक्रार करा
मोबाइल संच हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास नागरिकांनी पुणे पोलिसांच्या संकेतस्थळावर किंवा राज्य शासनाच्या ‘सीईआयआर’ या पोर्टलवर नोंद करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.