पुणे : खुनाचा प्रयत्न, महिलांची छेडछाड, दंगल माजविणे, हाणामारी करून दहशत पसरविणे असे गंभीर गुन्हे असलेल्या सराईतावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाई केली. यश विजय चांदणे (वय २२, रा. पठाण चाळ, बोपोडी) असे या सराइताचे नाव असून, त्याला बुलडाणा कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.

चांदणेविरुद्ध खुनाचा प्रयत्न, महिलांची छेडछाड, दंगल माजविणे, हाणामारी करून दहशत पसरविणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे अशा प्रकारचे पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतरही त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती न थांबल्याने खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांच्यामार्फत एमपीडीए कारवाईचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे सादर केला होता. अमितेश कुमार यांनी या प्रस्तावाची छाननी करून यश चांदणे याला एक वर्ष बुलडाणा कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. खडकी पोलिसांनी हा आदेश बजावून यशची रवानगी बुलडाणा कारागृहात केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, हवालदार बी. डी. शेवरे, अंमलदार स्वाती म्हस्के, विकास धायतडक, जया थिटे, नवनाथ शिंदे यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.