अर्ज स्वीकृती बंद, चारित्र्य पडताळणी ‘पेपरलेस’
बहुराष्ट्रीय कंपन्या, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, सरकारी तसेच खासगी कार्यालये येथील नोकरीपासून ते अगदी रखवालदार, हॉटेलमधील कर्मचारी, मजुरी इथपर्यंतच्या नोकरीसाठी अर्ज दिल्यानंतर त्या त्या ठिकाणी चारित्र्य पडताळणी करणे बंधनकारक आहे. चारित्र्य पडताळणीसंदर्भात पोलिसांकडून दिलेला अहवाल किंवा शिफारसपत्र जोडल्यानंतर पुढील कार्यवाही पार पडते. पुणे पोलीस आयुक्तालयात चारित्र्य पडताळणी करून घेणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्या संदर्भातील कागदपत्रांचा ढिगारा विशेष शाखेतील अर्ज स्वीकृती केंद्रात पाहायला मिळतो. या पाश्र्वभूमीवर पुणे पोलिसांकडून एक सप्टेंबरपासून चारित्र्य पडताळणीचे कामकाज ऑनलाइन होणार असून, अर्ज स्वीकृती बंद करण्यात येणार आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर चारित्र्य पडताळणीचा अर्ज सादर करण्यासाठी पोलीस आयुक्तालयात येण्याची गरज राहणार नाही. या निर्णयाचा सामान्यांना फायदा होणार आहे, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेतील सूत्रांनी दिली. चारित्र्य पडताळणी केल्याशिवाय पुढील प्रक्रिया पार पडत नाही. गेल्या काही वर्षांपासून पुणे शहराचा विस्तार वाढत आहे. माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये पुणे परिसरात आहेत. खासगी व्यवसायातदेखील चारित्र्य पडताळणी करून घेणे बंधनकारक आहे. उच्चपदस्थ अधिकाऱ्यापासून अगदी शिपायालादेखील एखाद्या संस्थेत नोकरी मिळवायाची असेल तर त्याला चारित्र्य पडताळणी अहवाल सादर करावा लागतो, असे विशेष शाखेतील अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
गेल्या काही वर्षांपासून चारित्र्य पडताळणी करून घेणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ होत आहे. विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांत चारित्र्य पडताळणी करून घेण्यासाठी नागरिकांचा ओघ वाढला आहे. चारित्र्य पडताळणी करण्यासाठी पोलीस आयुक्तालयातील एक खिडकी योजनेत अर्ज मिळतो. अर्ज स्वीकृतीबरोबर ऑनलाइन पद्धतीने चारित्र्य पडताळणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सामान्य नागरिकांकडून शंभर रुपये आणि रखवालदारांची चारित्र्य पडताळणी करण्यासाठी दोनशे रुपये शुल्क आकारण्यात येते. बहुसंख्य नागरिक चारित्र्य पडताळणीचे अर्ज पोलीस आयुक्तालयात (ऑफलाइन) सादर करतात. त्या तुलनेत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे प्रमाण तसे कमी आहे. अर्ज सादर केल्यानंतर त्यासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे जोडली जातात. साहजिकच अर्जाबरोबरच जोडण्यात येणाऱ्या कागदपत्रांचा ढिगारा विशेष शाखेतील अधिकाऱ्यांकडे पाहायला मिळतो. सध्या सर्व क्षेत्रात कागदविरहित कारभार सुरू झाला आहे. त्यामुळे चारित्र्य पडताळणीची अर्ज स्वीकृती एक सप्टेंबरपासून बंद करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचाराधीन आहे. अद्याप या प्रस्तावावर निर्णय झाला नसला तरी वरिष्ठ अधिकारीदेखील चारित्र्य पडताळणी ऑनलाइन करण्यासंदर्भात उत्सुक आहेत, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. https://pcs.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन चारित्र्य पडताळणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सहा महिन्यांत २९ हजार नागरिकांची पडताळणी
गेल्या सहा महिन्यांत चारित्र्य पडताळणी करून घेण्यासाठी ३० हजार ३३६ नागरिकांनी अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी २९ हजार नागरिकांना पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी अहवाल देण्यात आला आहे. चारित्र्य पडताळणी करून घेणाऱ्यांमध्ये उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपासून रिक्षाचालक, परप्रांतीय मजूर आदींचा समावेश आहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडून परमीट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर चारित्र्य पडताळणी करून घेण्यासाठी रिक्षाचालकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. चारित्र्य पडताळणीचा अहवाल तीस दिवसात देणे बंधनकारक आहे. मात्र, विशेष शाखेतील अधिकारी, कर्मचारी चारित्र्य पडताळणीसंदर्भात आलेल्या प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करून पंधरा ते वीस दिवसात चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देतात. ऑनलाइन चारित्र्य पडताळणी करून घेणाऱ्यांचे प्रमाणदेखील वाढत आहे, असे निरीक्षण विशेष शाखेतील पोलीस अधिकाऱ्यांनी नोंदवले.