पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी (१९ मे) मध्यरात्री भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण, तरुणी मृत्यूमुखी पडले. या घटनेनंतर महाराष्ट्रास देशभरात संतापाची लाट पसरली. ज्याप्रकारे अल्पवयीन आरोपीला १५ तासांत जामीन देण्यात आला त्यावरून पोलिसांवर टीका झाली. चहुबाजूंनी दबाव आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई करत अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अगरवाल, त्याला मद्य उपलब्ध करून देणारे पबमधील कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. आता या प्रकरणात अगरवाल यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही जबाब समोर आले आहेत. त्या रात्री विशाल अगरवाल यांनी चालकाला कोणत्या सूचना दिल्या, त्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी अल्पवयीन मुलगा चालवत असलेल्या मोटाराच्या चालकाचा जबाब नोंदवला आहे. मुलाने जर गाडी चालवायला मागितली तर त्याला गाडी दे आणि तू बाजूला बस, अशी सूचना अगरवाल यांनी दिली होती.

Porsche Accident: “दोन बळी घेणाऱ्या मुलाला पिझ्झा, बर्गर कुणी दिला?” राऊतांपाठोपाठ सुप्रिया सुळेंचा सवाल

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, अल्पवयीन आरोपीच्या आजोबांचा जबाब या प्रकरणात महत्त्वाचा आहे. ज्यामुळे अपघाताच्या रात्री काय झालं? याचा उलगडा होतो. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आपल्याला मित्रांबरोबर पार्टी करायची असल्याचे अल्पवयीन आरोपीने बुधवारी आपल्या कुटुंबियांना सांगितले होते. आजाबो सुरेंद्र अगरवाल यांनी आपला मुलगा विशाल अगरवालशी चर्चा केल्यानंतर नातवाला महागडच्या पोर्श कारची चावी दिली होती, तसेच पार्टीच्या खर्चासाठी क्रेडिट कार्ड दिले होते.

अमोल झेंडे यांनी सुरेंद्रकुमार अगरवाल यांच्या जबाबाची माहिती देताना सांगितले की, अल्पवयीन नातूला गाडीची चावी देण्याचे काय परिणाम होऊ शकतात, याची त्यांना बिलकूल कल्पना नव्हती. अगरवाल कुटुंबियांच्या चालकाने पोलिसांना सांगितले की, अल्पवयीन आरोपीनेच वडगाव शेरी येथील बंगल्यापासून कोझी पब आणि त्यानंतर ब्लॅक मॅरियट पब पर्यंत गाडी चालविली होती. ब्लॅक मॅरियटमधील पार्टी संपल्यानंतर चालकाने पार्किंगमधून गाडी बाहेर काढली.

Pune Porsche Accident: अल्पवयीन मुलाची आई कॅमेरासमोर ढसाढसा रडली, म्हणाली; “प्लीज..”

अल्पवयीन आरोपीने गाडी चालविण्याचा हट्ट केला

चालकाने दिलेल्या जबाबानुसार, मद्यपान केलेले असतानाही अल्पवयीन आरोपीने गाडी चालविण्याचा हट्ट केला. त्यामुळे चालकाने आरोपीच्या वडिलांना फोन करून याबाबत माहिती दिली. त्यानंतर विशाल अगरवाल यांनी मुलाला गाडी चालवू द्यावी, अशी सूचना केली. तसेच चालकाने बाजूच्या सीटवर बसावे, असेही सांगितले. त्यानंतर आरोपीने पोर्श कार बेदरकारपणे चालवत जबलपूर येथील दोन संगणक अभियंत्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.