पुणे : मालक गावाला गेल्यानंतर बंगल्यातील नोकरांना धमकावून दरोडा टाकण्याच्या प्रयत्न नोकरांच्या प्रसंगावधानामुळे फसला. तिजोरी बाहेर ओढून नेत असताना दोन नोकरांनी चोरट्यांना बंगल्यात कोडून ठेवले. चांदणी चौक परिसरातील एका सोसायटीत ही घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तीन दरोडेखोरांना ताब्यात घेतल्याचे प्रत्यक्षदर्शी अ‍ॅड. श्रीधर गोटे यांनी सांगितले.

पकडण्यात आलेले चोरटे आईस्क्रीम विक्री करणारे असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, चांदणी चौक परिसरात पाण्याच्या टाकीजवळ कलासागर नावाची सोसायटी आहे. याच सोसायटीत केटरींग व्यावसायिक पुरोहित राहायला आहेत. त्यांच्या घरी नोकर राहायला आहेत. कामानिमित्त पुरोहित कुटुंबीय गावी गेले होते. गुरूवारी दुपारी तिघेजण अचानक घरात शिरले. त्यातील एकाने नोकरांना धाक दाखविला घरातील तिजोरी कोठे ठेवली आहे, अशी विचारणा केली.

हेही वाचा…Pune Porsche Accident: अल्पवयीन मुलाची आई कॅमेरासमोर ढसाढसा रडली, म्हणाली; “प्लीज..”

यावेळी तिघांनी तिजोरी बाहेर ओढून नेण्याचा प्रयत्न केला. नोकरांनी प्रसंगावधान दाखवून बाहेरून कडी लाऊन घेतली. घरात चोरटे शिरल्याची माहिती मिळताच रहिवाशांनी गर्दी केली. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर कोथरूड पोलिसांनी दरोडेखोरांना शरण येण्यास सांगितले. रात्री नऊच्या सुमारास पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले. गुरूवारी रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा…कल्याणीनगर अपघात प्रकरणाला आता राजकीय वळण

दरम्यान, चोरीच्या उद्देशाने चोरटे एका घरात शिरले होते. यावेळी घरातील नोकरांनी चोरट्यांना कोंडून ठेवले. पोलिसांच्या पथकाने त्यांना जाऊन ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेले चोरटे आईस्क्रीम विक्रीचा व्यावसाय करत असल्याची माहिती मिळाली आहे, असे परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.