पुणे : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या ९ लाख वारकऱ्यांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या उपक्रमांतर्गत विनामूल्य आरोग्य तपासणी आणि औषधोपचाराची आरोग्य सेवा पुरविण्यात आली. पंढरपूरवरून वारी मूळ स्थानी पोहोचेपर्यंत परतीच्या प्रवासातही ही आरोग्य सेवा सुरू राहणार आहे.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या संतांच्या पालख्या आणि दिंड्यांमध्ये सहभागी झालेल्या लाखो वारकऱ्यांना रस्त्यात काही त्रास जाणवला की लगेच उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभागाने ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या उपक्रमाच्या माध्यमातून वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविली. या उपक्रमाच्या माध्यमातून पालखी मार्गावर आरोग्य विभागातर्फे प्रतिबंधात्मक, उपचारात्मक, आरोग्य संदर्भ सेवा देण्यात आली. वारकऱ्यांना पालखी मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती.
आरोग्य विभागाने आषाढी वारीच्या काळात विशेष मोहिमेच्या माध्यमातून ९ लाख २३ हजार ५०९ वारकऱ्यांना आतापर्यंत आरोग्य सेवा पुरविली असून परतीच्या वारीमध्येही १० जुलैपर्यंत विभागाकडून वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे. पालखी मार्गावर १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेमार्फत आतापर्यंत एकूण १ हजार ११४ वारकऱ्यांना अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरविण्यात आलेली आहे. त्यामुळे या वारकऱ्यांना जीवनदान मिळाले आहे. पालखी मार्गावर वारीमध्ये डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सहायक, आशा, आरोग्य सेवक, शिपाई, सफाईगार अशा सर्व कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. त्यासाठी विभागाचे ४ हजार ३७६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ कार्यरत होते.
पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर ‘आपला दवाखाना’ तात्पुरता उभारण्यात आला होता. तातडीच्या आरोग्य सेवेसाठी फिरत्या दुचाकी वाहनासह आरोग्यदूत तैनात ठेवण्यात आले होते. आषाढी वारीमध्ये पालखी मार्गावर मोठी गर्दी असल्याने प्रत्येक ठिकाणी रुग्णवाहिका फिरू शकत नाही, त्यामुळे फिरते दुचाकी आरोग्यदूत प्रथमोपचार पेटीसह सज्ज ठेवण्यात आले होते. त्यांच्या माध्यमातून वारकऱ्यांना तातडीची आरोग्य सेवा पुरविण्यात आली. याशिवाय १०२ व १०८ या क्रमांकाच्या रुग्णवाहिकाही पालखी मार्गावर सेवा देण्यासाठी कार्यरत होत्या. पालखीमध्ये दिंडी प्रमुखांना आरोग्य कीट देण्यात आली होती. याबरोबरच महिलांसाठी प्रत्येक ठिकाणी हिरकणी कक्षाची सुविधा देण्यात आली. तसेच, ५ चित्ररथांच्या माध्यमातून आरोग्य शिक्षण व जनजागृती करण्यासाठी विभागामार्फत नावीन्यपूर्ण व कल्पक पद्धतीने विविध उपक्रम राबविण्यात आले.
‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ मोहीम
- एकूण कर्मचारी – ४ हजार ३७६
- प्रत्येक ५ किलोमीटरवर ‘आपला दवाखाना’ – २०३
- वारी दरम्यान १०२ व १०८ रुग्णवाहिका – ३३१
- दिंडी प्रमुखांसाठी औषधी कीट – ३५००
- महिला वारकऱ्यांसाठी रुग्णालयामध्ये कार्यरत स्त्रीरोग तज्ज्ञ – १५
- पालखी मुक्कामाच्या ठिकाणी हिरकणी कक्ष – ३७
- पालखी मार्गावर आरोग्य दूत – २९०
- पालखी सोबत माहिती, शिक्षण व संदेशवहन चित्ररथ – ५
- पालखी मुक्कामाच्या ठिकाणी ५ रुग्णशय्या क्षमता असलेले अतिदक्षता कक्ष – ४६