जेजुरी : पुरंदर तालुक्यात पावसामुळे फळबागा आणि तरकारी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वीर, परिंचे, तोंडल, यादववाडी, हरगुडे, पांगारे या भागात शेतकऱ्यांनी लावलेल्या उन्हाळी भुईमूग, वाटाणा ,घेवडा, टोमॅटो, मिरची ,कांदा, कोथिंबीर या पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील अनेक भागांतील ओढे, नाले, तलाव तुडुंब भरले आहेत. बोपदेव घाट, चांबळी, गराडे, सासवड, नारायणपूर या परिसरात झालेल्या पावसामुळे कऱ्हा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.
सासवड पुलावरून १३० क्युसेक वेगाने पाणी वाहत असून, मंगळवारपर्यंत नाझरे धरणाला कऱ्हा नदीचे पाणी पोहोचण्याची शक्यता असल्याचे नाझरे धरणाचे शाखा अभियंता अनिल घोडके आणि उपअभियंता दत्तात्रय कसबे यांनी सांगितले.दरम्यान, ‘शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन पंचनामे करून फळबागायदारांना एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच वाटणा ,कांदा, टोमॅटो ,भुईमूग व इतर तरकारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे करावेत,’ अशी मागणी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार विक्रम राजपूत यांच्याकडे केली आहे. या वेळी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, संतोष जगताप, भानू जगताप, सचिन पठारे ,नदीम इनामदार आदी उपस्थित होते.
जेजुरी गड परिसरात संततधार
जेजुरीत सलग तीन दिवस संततधार सुरू आहे. सध्या सुट्ट्यांचे दिवस असल्याने खंडोबाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. मात्र, पावसामुळे भाविकांचे हाल होत आहेत. पावसाचा जेजुरीच्या विविध व्यवसायांवर परिणाम झाला आहे. गावातील रस्त्यांवर पाणी तुंबले आहे.
दिवे घाटात धबधबे
दिवे घाट परिसरामध्ये पाऊस पडत असल्याने काही धबधबे सुरू झाले आहेत. हिरवीगार वनराई, रिमझिम पावसाच्या धारा असे या परिसरातील अल्हाददायक वातावरण असल्याने अनेक जण गाड्या थांबवून आनंद घेत आहेत. सध्या दिवे घाटात रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, नेहमीसारखे धबधबे सुरू झाल्यामुळे या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी लोक येत आहेत.