पुणे : पुणे शहरात रविवार आणि सोमवारी झालेल्या जोरदार पावसामुळे रेल्वे स्थानकातील प्लॅटफाॅर्मच्या छतातून पावसाचे पाणी गळत आहे. अनेक ठिकाणी छतावर पत्रे नसल्याने पावसाचे पाणी प्लॅटफाॅर्मवर साचले. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. प्लॅटफाॅर्मवर आसने नसल्याने कानाकोपऱ्यात प्रवाशांना आसरा शोधावा लागला.

मध्य रेल्वेच्या पुणे रेल्वे स्थानकावरून उत्तरेकडे जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी आहे. गर्दीमुळे सामान्य डब्यातील प्रवाशांना स्वतंत्र रांगेद्वारे सोडण्याचे नियोजन केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस असल्याने स्थानकावरील प्लॅटफाॅर्म क्रमांक एकवरील आठ ते दहा खांबांच्या ठिकाणी पाणीगळती सुरू होती. प्लॅटफॉर्म क्रमांक दोनमधील काही ठिकाणी पत्रे नसल्याने या ठिकाणी पावसाचे पाणी थेट पडत होते. दरम्यान, प्रवाशांसाठी असलेली लोखंडी आसने प्लॅटफाॅर्म एकवरून काढण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

उत्तरप्रदेश येथे जाण्यासाठी गेल्या दोन तासांपासून रांगेत बसलो होतो. मात्र, छतातून पाणी गळत असल्याने प्लॅटफाॅर्ममधून पुन्हा बाहेर यावे लागले.- ग्यानकुमार, प्रवासी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जोरदार पावसामुळे पाणीगळती होत असल्याचे समोर आले. ज्या ठिकाणांवर पाणीगळती होत आहे, त्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.- हेमंतकुमार बेहरा, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग