पुणे : संततधारमुळे कात्रज बाह्यवळण मार्गावरील उंड्री परिसरात ओढ्याची भिंत कोसळून रस्त्यावर पाणी शिरल्याची घटना घडली. पावसामुळे शहर परिसरात आठ ठिकाणी झाडे कोसळली. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही.
शहर परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावरील उंड्री परिसरात ओढ्यातील पाण्याची पातळी वाढली होती. पाण्याला जोर होता. जोरदार प्रवाहामुळे ओढ्याची संरक्षक भिंत कोसळून रस्त्यावर पााणी शिरले. या परिसरातील सोसायटी, तसेच दुकानांमध्ये पाणी शिरले होते. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. या घटनेची माहिती महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाला रहिवाशांनी कळविली. महापालिका अधिकाऱ्यांनी पाहणी केली. पाण्याचा निचरा करण्यासाठी पंपाचा वापर करण्यात आला.
शहर परिसरात झालेल्या पावसामुळे आठ ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. बावधनमधील विज्ञाननगर, ढोले पाटील रस्त्यावरील सेंट्रल माॅल परिसर, नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीजवळ, फरासखाना पोलीस ठाण्याच्या परिसरात, लोहगाव चौक, हडपसर भागातील सिजन माॅल, तसेच एरंडवणे भागातील खिलारेवाडी परिसरात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यात पडलेल्या झाडांच्या फांद्या हटवून रस्ते वाहतुकीस माेकळे केले, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.