पुणे : रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या तक्रारी करण्यासाठी महापालिकेने तयार केलेल्या ‘पीएमसी रोड मित्र’ या मोबाईल ॲपमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. या ॲपवरून तक्रारी नोंदविताना त्रास होत असून, खड्ड्यांचे फोटो, माहिती नोंदविता येत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तक्रारी नोंदविण्याचा वारंवार प्रयत्न करूनही ॲपमध्ये त्याची नोंदच होत नसल्याने नागरिकांच्या त्रासात अधिकच भर पडत आहे.

शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची तक्रार थेट महापालिकेकडे करता यावी, यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या सूचनेनंतर पथ विभागाने ‘पीएमसी’ रोड मित्र हे मोबाईल ॲप सुरू केले आहे. यामध्ये नागरिकांना खड्ड्यांचे फोटो, व्हिडिओ अपलोड करून तक्रार करता येत आहे. तक्रार करताना यामध्ये अक्षांश-रेखांश येत असल्याने तक्रारीची दखल घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी महापालिकेला सविस्तर माहिती मिळते. हे मोबाईल ॲप सध्या अँड्रॉइड मोबाइलसाठी ‘प्ले स्टोअर’वर उपलब्ध आहे. या ॲपला पथ विभागाच्या सर्व अभियंत्यांची माहिती संलग्न करण्यात आली आहे.

महापालिकेने तक्रारी नोंदविण्यासाठी सुरू केलेल्या या मोबाईल ॲपला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या ॲपवर अधिकाऱ्यांची माहिती देण्यास आल्याने तक्रार नोंदविल्यानंतर ज्या भागातील ही तक्रार आहे. तेथील संबधित कनिष्ठ अभियंत्याकडे ही तक्रार जाते. तसेच, पथ विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे असलेल्या डॅशबोर्डवरदेखील ही माहिती समजते. त्यामुळे तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर वचक बसला आहे. तक्रार नोंदविल्यानंतर संबधित तक्रारदाराकडे ज्या अधिकाऱ्याकडे तक्रार गेली आहे. त्याची माहितीदेखील एसएमएस द्वारे संबधित तक्रारदार नागरिकाला कळविली जाते.

गेल्या काही दिवसांपासून या ॲपमध्ये तक्रार नोंदविताना अनेक समस्या येत आहेत. हे ॲप सुरू केल्यानंतर त्यात थोडी माहिती भरली, की लगेच हे ॲप बंद पडत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. तसेच, यापूर्वी केलेल्या तक्रारींची दखल महापालिकेच्या पथ विभागाकडून घेतली जात नसल्याचा आरोपही होत आहे. काही घटनांमध्ये तक्रार करताना नागरिक खड्ड्याऐवजी दुसरेच फोटो ॲपवर टाकत असल्याने पथ विभागातील कर्मचारी, अधिकारी यांची डोकेदुखी देखील वाढली आहे. दरम्यान, या ॲपबाबत समस्या नसल्याचे महापालिकेच्या पथ विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

तांत्रिक अडचणींमुळे काही वेळेस ॲपमध्ये तक्रार नोंदविताना वेळ लागत असेल. मात्र, हे ॲप सुरू आहे. नागरिकांना काही अडचणी येत असतील, तर त्यांनी तातडीने पथ विभागाशी संपर्क साधावा. त्यांच्या अडचणी सोडविल्या जातील. – अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता, पथ विभाग

रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या मोबाईल ॲपवर तक्रार नोंदविताना अडचण येते. ॲप सुरू झाल्यानंतर मध्येच बंद पडते. महापालिकेतील अधिकारी दाद देत नाहीत. – कपिल कर्वे, नागरिक