वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची चर्चा राज्यभरात सुरू आहे. वैष्णवी यांनी सासरकडील लोकांच्या छळामुळे आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिला मारहाण झाल्याचे तपासात उघडकीस आले. या घटनेनंतर समाजमन सुन्न झाले आहे. पुण्यासारख्या पुरोगामी शहरात अशा घटना अजूनही घडत असून, छळामुळे आत्महत्यांच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाढ झाली आहे.
पुणे शहरात गेल्या आठ वर्षांत सासरकडील छळ, जाच, टोमण्यांमुळे, सासरकडच्यांच्या अवास्तव मागण्यांमुळे २०७ महिलांनी आत्महत्या केल्याचे पुणे पोलिसांकडे उपलब्ध असलेल्या माहितीत दिसते आहे. पुण्यासारख्या पुराेगामी शहरात छळामुळे महिलांच्या आत्महत्यांचे हे वाढते प्रमाण निश्चितच चिंताजनक आहे. शहरात दर वर्षी विवाहितांचा शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याप्रकरणी २५० ते ३०० गुन्हे दाखल होतात. पुणे, तसेच पिंपरी-चिंचवड शहरात विवाहितांच्या छळाच्या घटना वाढत असल्याने आता महिलांच्या हक्कांविषयी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी या प्रकरणात लक्ष घालून अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांना एकत्रित आणून काम करण्याची गरज आहे.
पुणे, तसेच पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार वाढत आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला कार्यरत आहेत. संसाराचा गाडा ओढणाऱ्या महिला सर्वच क्षेत्रांत अग्रेसर आहेत. मात्र, चार भिंतींआड महिलांचा किरकोळ कारणांवरून छळ होत असल्याची बाब क्लेषदायी आहे. उच्चशिक्षित महिलांचाही छळ होतो आणि त्यांनाही आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घ्यावासा वाटतो. असा टोकाचा निर्णय घेण्याची मानसिकता का निर्माण होते, याचा विचार करणे गरजेचे आहे.
पोलीस दफ्तरी दाखल झालेल्या गुन्ह्यांव्यतिरिक्त काही घटनांना वाचा फुटत नाही. ‘काही महिला पोलिसांकडे तक्रार देत नाहीत. कुटुंबाची घडी विस्कटू नये म्हणून किंवा मुलांचे भवितव्य विचारात घेऊन छळ सहन केला जातो. आई-वडील, नातेवाइकांकडे तक्रार केली जाते. मात्र, संसार करताना सांभाळून घ्यावे लागते, सबुरीने घे, सर्व ठीक होईल, असे सल्ले दिले जातात. पोलिसांकडे तक्रार दिल्यास कुटुंबांची प्रतिष्ठा धोक्यात येईल, असेही सांगितले जाते. दोन्ही कुटुंबांतील ज्येष्ठ सामोपचाराने प्रकरण मिटवतात. काही दिवस उलटताच पुन्हा छळ सुरू होतो आणि या छळामुळे महिला आत्महत्येचा निर्णय घेतात,’ असे निरीक्षण पोलीस अधिकारी नोंदवितात.
भारतीय न्याय संहितेंर्गत (बीएनएस) कलम ८० नुसार, एखाद्या विवाहित महिलेचा विवाहानंतर सात वर्षांच्या आत मृत्यू झाल्यास, तसेच शारीरिक जखम किंवा संशयास्पद परिस्थितीत झाल्यास, मृत्यूपूर्वी पती किंवा नातेवाइकांनी हुंड्याच्या मागणीसाठी छळ केल्यास अशा प्रकरणाची नोंद हुंडाबळी म्हणून केली जाते. अशा प्रकरणात कठोर शिक्षेची तरतूद आहे. आरोपी पती, तसेच नातेवाइक दोषी असल्याचे सिद्ध झाल्यास कमीत कमी सात वर्षे ते जास्तीत जास्त जन्मठेप अशा शिक्षेची तरतूद आहे. भारतीय न्याय संहिता कलम १०८ अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद आहे.
कौटुंबिक हिंसाचार, छळ, आत्महत्या अशा प्रकारचे गुन्हे दाखल होण्याचे वाढते प्रमाण हे समाजस्वास्थ्य बिघडल्याचे निदर्शक आहे, हे नक्की. अशा घटनांना आळा घालण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी, तसेच शासकीय यंत्रणांनी एकत्र येऊन विचार करणे गरजेचे आहे. धनिकांपासून सामान्यांनी याचा गांभीर्याने विचार केल्यास वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणासारख्या घटना रोखता येणे शक्य होईल.
rahul.khaladkar@expressindia.com