पुणे / जेजुरी : जेजुरी-मोरगाव रस्त्यावर भरधाव मोटारीने टेम्पोला धडक दिल्याने झालेल्या अपघातात नऊ जण ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. अपघातात सहा जण जखमी झाले असून, चौघांची प्रकृती गंभीर आहे.
सोमनाथ रामचंद्र वायसे, रामू संजीवन यादव (दोघेही रा. नाझरे, ता. पुरंदर), अजयकुमार चव्हाण (रा. उत्तर प्रदेश), अजित अशोक जाधव (रा. कांजळे, ता. भोर), किरण भारत राऊत , त्यांचा मुलगा सार्थक (वय ७, रा. दोघेही पवारवाडी, ता. इंदापूर), अश्विनी संतोष ऐसार (रा. नागरसूर, सोलापूर), अक्षय शंकर राऊत (रा.झारगडवाडी, ता. बारामती) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या एकाची ओळख पटू शकली नाही. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेजुरी-मोरगाव रस्त्यावरील किर्लोस्कर कंपनीजवळ श्रीराम ढाब्याजवळ एक पिकअप टेम्पो थांबला होता. टेम्पोतील सामान खाली उतरवण्याचे काम सुरू होते. दोघे सामान उतरवित होते. या वेळी पुण्याकडून मोरगावकडे निघालेल्या एका भरधाव मोटारीने टेम्पोला धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की, शेजारी थांबलेल्या एका दुसऱ्या मोटारीला त्यानंतर धडक बसली.
भरधाव वेगाचे बळी
टेम्पोतील सामान उतरविणारे दोघे तसेच, ढाब्यासमोर थांबलेले तिघे आणि मोटारीतील तिघांचा अशा आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दोन लहान मुले, एका महिलेचा समावेश आहे. ढाबाचालक आणि कामगारांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. गंभीर जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मोटारचालकाच्या बेजबाबदारपणामुळे अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अपघातानंतर कोंडी
अपघातानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त मोटार, टेम्पोचा चुराडा झाला होता. अपघातानंतर जेजुरी-मोरगाव रस्त्यावर कोंडी झाली होती. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढण्यात आली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. अपघातात चार वाहनांचे नुकसान झाले.