जमीन खरेदी विक्री व्यवहार करणाऱ्या दलालाचा खून करण्यासाठी सराईतांना ३० लाखांची सुपारी दिल्याचे उघडकीस आले आहे. जमीन दाखविण्याच्या बहाण्याने दलालाला मुळशीत नेऊन त्याला पिस्तुलाचा धाक दाखवून सराईतांनी ६० लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी चौघांच्या विरोधात चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकरणी रोहित आखाडे (रा. कोथरुड), आकाश कंधारे (रा. चिंचवड), संकेत दहिंजे (रा. सेनापती बापट रस्ता) तसेच राजू कुऱ्हाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित आणि आकाश सराईत गुन्हेगार असून दोघांना एका गुन्ह्यात पोलिसांनी नुकतीच अटक केली होती. कारागृहातून दोघांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हे शाखेकडून त्यांची चौकशी सुरू आहे. याबाबत एकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार जमीन खरेदी विक्री व्यवसाय करतो.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तरुणाचा मोबाइल हिसकावला

एका परिचितामार्फत तक्रारदाराची आरोपींशी ओळख झाली होती. आरोपी राजू कुऱ्हाडेने रोहित आखाडे, आकाश कंधारे, संकेत दहिंजे यांना तक्रारदाराला जीवे मारण्यासाठी ३० लाखांची सुपारी दिली होती. त्यानंतर जमीन दाखविण्याच्या बहाण्याने आरोपींनी तक्रारदाराला मुळशीतील कोंढावळे-बेलावडे भागात नेले. तेथे आरोपींनी त्याच्यावर पिस्तुल रोखले आणि ६० लाख रुपयांची खंडणी मागितली. व्यवसाय करायचा असल्यास ६० लाखांची खंडणी द्यावी लागेल. खंडणी न दिल्यास जिवे मारु, अशी धमकी आरोपींनी तक्रारदाराला दिली होती. तक्रारदाराने आरोपींना तेथे ५० हजार रुपये दिले. आरोपींच्या तावडीतून सुटल्यानंतर घाबरलेल्या तक्रारदाराने पोलिसांकडे फिर्याद दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune rs 30 lakh paid for murder of land broker pune print news msr
First published on: 09-07-2022 at 11:06 IST