पुणे : वारंवार वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालक, मालकांना नोटीस पाठवून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) दंड भरवा लागत होता. मात्र, परिवहन विभागाने ऑनलाईन दंड भरण्याची सुलभ सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता वाहनचालकांना आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज भासणार नसल्याने दिलासा मिळणार आहे.

परिवहन विभागाच्या आरटीओ विभागामार्फत रस्ता सुरक्षा पथकांमार्फत शहरातील विविध ठिकाणी वाहतूक तपासणी मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेदरम्यान नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना अतिवेगात वाहन चालवणे, विनाहेल्मेट – सीटबेल्ट प्रवास, मद्यसेवन करून वाहन चालविणे, विनापरवाना किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविणाऱ्यांवर तपासणी अधिकाऱ्यांकडून ऑनलाईन दंडात्मक चलनाद्वारे कारवाई करण्यात येते.

मात्र, यामध्ये ज्या वाहनचालकांवर तीन किंवा त्यापेक्षा जास्त चलन असल्यास तसेच वेळेत दंड न भरल्यास नोटीस पाठवून त्यांना प्रत्यक्षात आरटीओत उपस्थित राहून दंड भरावा लागत होता. त्याशिवाय, वाहनाचे पुढील काम होत नसल्याने वाहनचालकांची आरटीओत गर्दी होत असे.

ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी परिवहन विभागाने डिजिटल माध्यमाचा अवलंब स्वीकारला आहे. संबंधित वाहनचालकाला मिळालेली ई-चलनाची नोटीस https://echallan.parivahan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन भरता येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे सूचित करण्यात आले आहे.

परिवहन विभागाच्या नवीन निर्णयानुसार, वाहनचालकांवर गुन्हा दाखल झाल्यास, वाहनमालकांनी किंवा चालकांनी ऑनलाईन पद्धतीने दंड भरल्यास त्यांना आरटीओत येण्याची आवश्यकता नाही. ऑनलाईन पद्धतीने दंड भरताना काही अडचणी आल्यास वाहनमालकांनी आरटीओत संपर्क साधावा. – स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.