पीवायसी मैदानाशी माझ्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. त्याला उजाळा मिळाल्याचे भारताचा मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकर याने म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी सचिन एका वैयक्तिक सोहळ्यासाठी पीवायसी हिंदू जिमखान्यावर आला होता. त्यावेळी नवे रुप धारण केलेल्या पीवायसीच्या मैदानाने तो भारावून गेला आणि थेट मैदानावर गेला. या भेटीचा एक व्हिडियो सचिनने इन्स्टाग्रामवर टाकला आणि त्याची पुणे भेट एकदम चर्चेत आली. माझ्या जुन्या आठवणींना उजाळा देणारा हा क्षण आहे, अशी कॅप्शनही सचिनने या व्हिडिओला दिली आहे.

हेही वाचा – Asia Cup 2022: आशिया चषकासाठी विराट कोहलीने कंबर कसली! ‘अशा’ प्रकारे सुरू केली तयारी

“१५ वर्षांखालील गटात पहिलाच सामना मी या मैदानावर खेळलो. माझा शालेय सहकारी राहुल गणपुले फलंदाजी करत होता. त्याने मला तिसरी धाव घेण्यासाठी हाक दिली. मी खूप वेगाने धावलो नाही आणि धावबाद झालो. माझ्या केवळ ४ धावा झाल्या. अशा पद्धतीने बाद झाल्याने मी दुखावलो गेलो आणि रडायलाच लागलो”, असे सचिन म्हणाला.“ड्रेसिंगरुममध्ये परतेपर्यंत मी रडतच होतो. त्यावेळी अब्दुस ईस्माईल मुंबई संघाचे व्यवस्थापक होते. मिलिंद रेगे आणि वासू परांजपे हे दिग्गजही या सामन्याला उपस्थित होते. त्यांनी मला धीर दिला आणि पुढील सामन्यांवर लक्ष केंद्रित कर”, असे सांगितल्याचे सचिनने पुढे म्हटले आहे.

हेही वाचा – IND vs ZIM ODI Series: झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला गुरुवारपासून होणार सुरुवात; असे असतील संभाव्य संघ आणि खेळपट्टी

तब्बल ३५ वर्षांनी पुन्हा या मैदानावर आलो आहे. त्यामुळे काहीसा भावनात्मक झालो. मला येथे पुन्हा यायला आवडेल, असेही त्याने म्हटले आहे.