जेजुरी : संत सोपानदेव पालखी सोहळ्याचे सोमवारी पंढरपूरला प्रस्थान झाले. संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा सासवड येथे मुक्कामी असून, मंगळवारी जेजुरीला मार्गक्रमण करणार आहे. माउलींच्या पालखी सोहळ्याबरोबर असलेल्या हजारो वारकऱ्यांनी संत सोपानदेव मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी केली.
यंदा संत सोपानदेव पालखी सोहळ्यात ११८ दिंड्या आहेत. प्रथेप्रमाणे, ‘माझी मिराशी गा देवा॥ तुझी चरण सेवा पांडुरंगा॥’ या अभंगाने सोहळ्यास प्रारंभ झाला. पहाटे गोसावी बंधू आणि ट्रस्टच्या वतीने श्रींच्या पादुकांना गंगा स्नान, दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर आळंदी देवस्थानाच्या वतीने परंपरेप्रमाणे नैवेद्य दाखवण्यात आला. पादुकांचे औक्षण झाल्यानंतर मानकरी बाळासाहेब केंजळे यांनी सूचना देताच श्रींच्या पादुका वीणा मंडपात नेण्यात आल्या. पायीवारी करणाऱ्या दिंडी सोहळ्यातील प्रमुख, मानकरी, वीणेकरी, चोपदार यांचा सन्मान करण्यात आला. सोहळ्यासाठी आमदार विजय शिवतारे, माजी आमदार संजय जगताप, आळंदी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त भावार्थ देखणे, प्रांताधिकारी वर्षा लांडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, सासवडचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण आदी उपस्थित होते.
विसावा विठ्ठल मंदिराचे प्रमुख किरण पुरंदरे परिवाराकडून आरती करण्यात आल्यानंतर संत सोपानदेव पालखी सोहळा प्रमुख ॲड. त्रिगुण गोसावी यांचा सन्मान करण्यात आला.पांगारेला मुक्काम संत सोपानदेव पालखी सोहळा पांगारे (पुरंदर ) येथे मुक्कामी असून, नीरा, सोमेश्वरनगर, बारामती, भवानीनगर, अकलूज, वाखरीमार्गे पंढरपूरला पोहोचणार आहे. सासवडला कऱ्हा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत असल्याने या ठिकाणी अनेक वारकऱ्यांनी स्नान केले.
योगी चांगावटेश्वर पालखीचेही प्रस्थान
सासवड येथील कऱ्हा नदीच्या काठी संत सोपानदेव मंदिराच्या शेजारीच असलेल्या लक्ष्मीनारायण मंदिरातून संत योगी चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळ्याचेही सोमवारी प्रस्थान झाले. या दोन्ही पालखी सोहळ्यांचे मार्ग वेगळे आहेत. आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथामधून योगी चांगदेव महाराजांचा सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. प्रथेप्रमाणे मानाच्या दिंड्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाल्या आहेत. योगी चांगावटेश्वर पालखी सोहळा खळद, यवत, पाटस, भिगवण, इंदापूर, अकलूजमार्गे पंढरपूरला पोहोचणार आहे.