पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात नोंदणी खिडकीसमोर तासनतास रांगेत उभे असलेले रुग्णांचे चित्र नित्याचे होते. खिडकीत बसलेला कर्मचारी रुग्णाचे सर्व तपशील लिहून घेत असल्याने या प्रक्रियेला विलंबही अधिक लागत असे. आता ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन झाली आहे. यामुळे बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने केली जात असून, एखादा रुग्ण पुन्हा आल्यानंतर एका क्लिकवर त्याची आधीची माहिती उपलब्ध होत आहे.
ससून सर्वोपचार रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची नोंदणी कर्मचारी लिखित पद्धतीने करीत असत. आता ही नोंदणी पूर्णपणे ऑनलाईन होत आहे. राष्ट्रीय सूचना केंद्राने विकसित केलेल्या नेक्स्ट जनरेशन ई-हॉस्पिटल प्रणालीचा यासाठी वापर केला जात आहे. रुग्णालयात ऑनलाइन नोंदणीसाठी एकूण २० संगणक आणि २० कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यातील १८ संगणक बाह्यरुग्ण विभागात आणि मानसोपचार व अस्थिव्यंगोपचार विभागात प्रत्येकी एक संगणक बसविण्यात आला आहे. या संगणकांवर ससूनमधील कर्मचाऱ्यांकडून रुग्णालयात दररोज येणाऱ्या सुमारे १ हजार ७०० रुग्णांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने केली जात आहे.
ऑनलाइन नोंदणीमुळे एखादा रुग्ण पुन्हा आल्यानंतर नव्याने त्याची नोंदणी करावी लागत नाही. त्याने मोबाईल क्रमांक अथवा त्याला दिलेला विशिष्ट रुग्ण क्रमांक दिल्यानंतर रुग्णाचा सर्व तपशील एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. त्यामुळे ही प्रक्रिया अधिक वेगवान होत आहे. सर्वसाधारणपणे रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात सोमवार आणि मंगळवारी रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यानंतर बुधवार ते शनिवार या दिवसांमध्ये रुग्णांची संख्या तुलनेने कमी दिसून येते. बाह्यरुग्ण विभागात सकाळी ८.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत रुग्णांची नोंदणी केली जाते, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
रुग्णाचा कोणता तपशील?
- रुग्णाचे नाव
- मोबाईल क्रमांक
- लिंग
- वय
- आधार क्रमांक
ससून रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची नोंदणी ऑनलाइन सुरू झाली आहे. येत्या तीन महिन्यांत आंतररुग्ण विभागातील रुग्णांची नोंदणीही ऑनलाइन करण्यात येईल. त्यातून रुग्णाची माहिती, वैद्यकीय तपासणी अहवाल, उपचार आणि शस्त्रक्रिया आदी तपशील एका क्लिकवर उपलब्ध होतील. – डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रुग्णालय