शिवसेनेचे नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक सुनील टिंगरे यांनी सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी या दोघांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला. पक्षनेतृत्त्वाला कंटाळल्यामुळे प्रमोदनाना भानगिरे यांनी मनसेमध्ये प्रवेश केल्याचे समजते.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी रविवारी मुंबईत दसरा मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर लगेचच दुसऱया दिवशी मुंबईतील शिवसेनेच्या कामगार संघटनांतील काही नेते आणि कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील टिंगरे आणि भानगिरे यांनीही मनसेमध्ये प्रवेश केला. पुणे महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत टिंगरे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारी नाकारली होती.