पुणे : ‘पाकिस्तानकडून होत असलेल्या दहशतवादाला उत्तर देण्यासाठी भारताने केलेला लक्ष्यभेद आवश्यकच होता. जे घडले ते युद्धच नव्हते. त्यामुळे युद्धविरामही नव्हता. पण, आपले नाव कोणी घेत नाही, असे ध्यानात आल्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेऊन माझ्यामुळे युद्ध संपल्याचे जाहीर केले. मुळात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मध्यस्थाची गरजच नव्हती’, असे परखड मत अमेरिकेतील मराठी खासदार आणि उद्योगपती श्री ठाणेदार यांनी गुरुवारी व्यक्त केले.
महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ, गर्जे मराठी ग्लोबल, पिंपरी-चिंचवड विद्यापीठ आणि रुरल आंत्रप्रिन्युअर कनेक्ट इनिशिएटिव्ह यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात श्री ठाणेदार यांनी संवाद साधला. त्या प्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर, कॉमसेन्स टेक्नॉलॉजीजचे अध्यक्ष सागर बाबर, माधव दाबके, नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर या वेळी उपस्थित होते.
‘अमेरिका हा स्थलांतरितांचा देश आहे. अशा स्थलांतरितांनीच अमेरिकेचे भले केले. तेथील ५० टक्के लोकसंख्या ही आफ्रिकी काळ्या वंशाच्या नागरिकांची आहे. पण, अमेरिका ही गोऱ्यांची असावी ही ट्रम्प समर्थकांची इच्छा आहे. त्याच भूमिकेतून स्थलांतरितांना विरोध होत आहे. हे धोरण अमेरिकेला हानी पोहोचविणारे आहे,’ अशा शब्दांत ठाणेदार यांनी ट्रम्प यांच्या धोरणांवर टीका केली. ‘४३५ पैकी एक असलेला मी डेमोक्रॅटिक पक्षाचा खासदार या नात्याने साडेसात लाख नागरिकांचे प्रतिनिधित्व करतो. मात्र, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विरोधक आवडत नाहीत. विरोधी मतेही त्यांना चालत नाहीत. ते काम एका मराठी माणसाला करावे लागत आहे,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले. काळा माणूस आपला लोकप्रतिनिधी नको या भूमिकेतून मलाही विरोध होत आहे, असेही त्यांनी सांगितले.
‘अमेरिका हा श्रीमंतांचा देश आहे, हा गैरसमज असून, तेथे १५ टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली आहे. गरीब-श्रीमंतांमधील दरी वाढत आहे’, असे सांगून ठाणेदार म्हणाले, ‘मोठी उलाढाल असलेला व्यवसाय मंदीमध्ये गमावला. १६ हजार चौरस फुटांचे घरही बँकेने ताब्यात घेतले. २००६ मध्ये नव्याने सुरुवात करून दहा वर्षांत उद्योग भरभराटीला आणला. त्यावर आधारित ‘पुन्हा श्रीगणेशा’ हे नवे पुस्तक लिहिले आहे. तरुणांना संधी देऊन नवे उद्योजक घडवत आहे. अपयशातून उद्याच्या यशाची गुरुकिल्ली सापडते. त्यामुळे अपयशाने कचून जायचे नाही. तर, आत्मविश्वासाने वाटचाल करायची.’
‘आत्मनिर्भर भारत’अंतर्गत संरक्षण सामग्री उत्पादन क्षेत्रात योगदान देणारे उद्योजक गणेश निभे यांचा ठाणेदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
अमेरिकेतील संसदेला काँग्रेस आणि खासदाराला काँग्रेसमन संबोधिले जाते. त्या अर्थाने मी काँग्रेसमन आहे. त्याचा इथल्या काँग्रेसशी काही संबंध नाही – श्री ठाणेदार, अमेरिकेतील मराठी खासदार