पुणे : क्वांटम तंत्रज्ञानामध्ये एक पाऊल पुढे पडले आहे. बंगळुरूस्थित दोन नवउद्यमींनी क्वांटम तंत्रज्ञानामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. एका नवउद्यमीने देशातील सर्वांत शक्तिशाली क्वांटम प्रोसेसरची निर्मिती केली असून, दुसऱ्या नवउद्यमीने क्वांटम वितरण व्यवस्था विकसित केली आहे.
पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने (आयसर पुणे) याबाबतची माहिती दिली. केंद्र सरकारने राष्ट्रीय क्वांटम मिशन घोषित केले आहे. त्यासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन आणि विकासाद्वारे भारतात क्वांटम तंत्रज्ञान पुढे नेण्यासाठी ६ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या अंतर्गत आयसर पुणेमध्ये स्थापन करण्यात आलेल्या आय-हब क्वांटम टेक्नॉलॉजी फाउंडेशनअंतर्गत बंगळुरूस्थित दोन नवउद्यमींना क्वांटम तंत्रज्ञाननिर्मितीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या नवउद्यमींनी त्यांच्या क्वांटम तंत्रज्ञानाचे सादरीकरण ‘इमर्जिंग सायन्स टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह’मध्ये केले. विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह, प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय सूद, राष्ट्रीय क्वांटम मिशनच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अजय चौधरी, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय करंदीकर या वेळी उपस्थित होते.
क्यूपीआयएआय या नवउद्यमीने ‘कावेरी ६४’ नावाचा क्वांटम प्रोसेसर तयार केला आहे. भारतात विकसित केलेला हा सर्वांत शक्तिशाली क्वांटम प्रोसेसर ६४ क्युबिटचा आहे. क्विट चिप व्यवसाय, संशोधन संस्था, सरकारी एजन्सी यांना औषध शोध, क्रिप्टोग्राफी, मशिन लर्निंग आणि ऑप्टिमायझेशन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील जटिल समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त ठरू शकणारा हा प्रोसेसर २०२६च्या उत्तरार्धात व्यावसायिकरीत्या उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. तसेच क्यूएनयू लॅब्स या नवउद्यमीने ५०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर पसरलेली भारतातील पहिली व्यापक क्वांटम वितरण व्यवस्था (क्वांटम की डिस्ट्रिब्युशन नेटवर्क) विकसित केली आहे. ही व्यवस्था सध्याच्या ऑप्टिकल फायबर सुविधांवर तैनात केली जाऊ शकते. या व्यवस्थेची लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या मदतीने राजस्थानात चाचणी घेण्यात आली. त्यात ५०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर ‘एण्ड-टू-एण्ड क्वांटम की एक्सचेंज’ यशस्वीरीत्या सक्षम करण्यात आले. ही चाचणी भारतातील क्वांटम-सुरक्षित संप्रेषणांच्या प्रगतीमध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्याशिवाय ‘क्वांटम रँडम नंबर जनरेटर सिस्टम इन पॅकेज’ही याच नवउद्यमीने विकसित केले आहे. या तंत्रज्ञानामुळे सायबर धोक्यांपासून आणि भविष्यातील क्वांटम हल्ल्यांपासून सर्वांत मजबूत संरक्षण मिळण्यास मदत होऊ शकते, अशी माहिती आयसर पुणेतर्फे देण्यात आली.
क्वांटम तंत्रज्ञानासारख्या सखोल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उत्पादन विकासासाठी प्रभावीपणे सहकार्य करणे आवश्यक आहे. त्यासाठी आय-हब क्वांटम टेक्नॉलॉजी फाउंडेशन अनेक नवउद्यमींना निधी, मार्गदर्शनाद्वारे सक्षम करत आहे. नॅशनल मिशन फॉर इंटरडिसिप्लिनरी सायबर फिजिकल सिस्टीम्सच्या केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने आय हब क्वांटम टेक्नॉलॉजी फाउंडेशनसाठी आयसर पुणेची यजमान संस्था म्हणून निवड केली. या निर्णयाचे परिणाम आता क्वांटम उत्पादनांच्या रूपात दिसत आहेत. – प्रा. सुनील नायर, प्रकल्प संचालक, आय-हब क्वांटम टेक्नॉलॉजी फाउंडेशन
क्वांटम उत्पादने विकसित केलेल्या दोन नवउद्यमींच्या यशात आयसर पुणेतील क्वांटम हबने योगदान दिले आहे, तंत्रज्ञान विकसनासाठी सक्षम केले आहे, याचा आनंद आहे. अशा भागीदारीतून क्वांटम तंत्रज्ञानातील भारताची तज्ज्ञता, भविष्यातील तयारी वाढवणे शक्य होईल. – प्रा. सुनील भागवत, संचालक, आयसर पुणे
