पुणे : शहरात गेल्या दोन दिवसांपासून मेघगर्जनेसह, मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना, स्वारगेट बस स्थानकातील प्रवासी, तसेच एसटीलादेखील याचा फटका बसला. सहा महिन्यांपूर्वी १.२ कोटी रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात आलेल्या स्थानकात पाण्याचे तळे साचल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
या बस स्थानकाच्या परिसरात दुर्गंधी, प्रवाशांची गैरसोय आणि वाहतुकीला अडथळा, अशा अनेक समस्या होत्या. एसटी महामंडळ आणि पुणे महानगरपालिका यांनी परिसरातील जुन्या मलनिस्सारण वाहिन्यांची दुरुस्ती करून नवीन वाहिन्या टाकल्या. पाणथळ असलेल्या ठिकाणी भराव टाकण्यात आला. लोखंडी जाळ्यांची गटारे तयार करण्यात आली. मार्च महिन्यात हे काम पूर्ण करण्यात आले. त्यासाठी सुमारे १.२ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.
मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामध्ये कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात वाहून गेल्याचे दिसून आले. बस स्थानकाच्या उत्तर आणि पश्चिम भागातील प्रवेशद्वारांच्या रस्त्यावर खड्डे आणि पाणी साचत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. स्थानकाच्या दक्षिणेकडील भागात दुरुस्ती आगारातही पाण्याचे मोठे तळे साचत असल्याने बस वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.
परिवहन मंत्र्यांकडून कानउघाडणी
दोन दिवसांपूर्वी परिवहन मंत्री सरनाईक यांनी स्वारगेटच्या स्थानकात येऊन पाहणी केली. मात्र, मंत्री येणार याची कुणकुण लागल्याने स्थानकातील अडथळे दूर करण्यात आले. स्वच्छतागृहे स्वच्छ करण्यात आली. ही तात्पुरती मलमपट्टी पाहून सरनाईक यांनी असुविधेवरून अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. या भेटीनंतर दोन दिवस झालेल्या पावसाने या स्थानकात पाण्याचे तळे साचल्याने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.
स्वारगेट स्थानकात पाणी साचत असलेल्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर जास्त असल्याने पाणी साचले. रस्त्यांची दुरुस्ती महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आली आहे. पाणी साचणाऱ्या ठिकाणी आणि रस्ते दुरुस्तीसाठी संबंधित विभागांना पुन्हा सूचना देण्यात आल्या आहेत. – अरुण सीया, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ