मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर दरी पुलाजवळ अज्ञाताचा मृतदेह सापडला. मृतावस्थेत सापडलेल्या व्यक्तीचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
याबाबत पोलीस कर्मचारी धनाजी धोत्रे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बाह्यवळण मार्गावर दरी पुलाजवळ एक जण मृतावस्थेत सापडल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खून झालेल्या व्यक्तीच्या शरीरावर शस्त्राने वार करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. खून झालेल्या व्यक्तीचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष असून पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू आहेत.
मृतदेह वाहनातून दरीपूल परिसरात आणण्यात आला असून मृतदेह टाकून आरोपी पसार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. खुनामागचे कारण समजू शकले नाही. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ तपास करत आहेत.
