पुणे : अभिजात संगीताच्या क्षेत्रातील जगभरात नावलौकिक संपादन केलेला सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदाच्या वर्षी नेमका आहे केव्हा? शास्त्रीय संगीताच्या रसिकांना उत्सुकता असलेल्या या महोत्सवाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. सर्वसाधारणपणे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातील बुधवारपासून पाच दिवस हा महोत्सव रसिकांना आनंद देत असला तरी या महोत्सवाच्या तारखांविषयी कानसेन पुणेकरांना कुतूहल असते. परदेशातून भारतात आणि त्यातही पुण्यात येणाऱ्या रसिकांना त्यांच्या आरक्षणाच्या दृष्टीने सोयीचे व्हावे म्हणून किमान दोन महिने आधी महोत्सवाच्या तारखांची घोषणा केली जाते.
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या आणि शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात जगभरात मान्यता असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती कळवली आहे.
यंदा ७१ व्या वर्षात पदार्पण करणारा हा महोत्सव मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रीडा संकुलात दिनांक १० ते १४ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. महोत्सवाविषयी अधिक माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही जोशी यांनी या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. सवाई गंधर्व यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचे शिष्य पं. भीमसेन जोशी यांनी स्मृती मैफल सुरू केली. आप्पा बळवंत चौकातील लक्ष्मी क्रीडा मंदिर येथे सुरू झालेल्या स्मृती मैफलीचे कालांतराने महोत्सवात रूपांतर झाले. रेणुका स्वरूप प्रशालेचे मैदान आणि रमणबाग प्रशालेचे मैदान येथून हा महोत्सव आता महाराष्ट्रीय मंडळाच्या मैदानावर स्थिरावला आहे.
ज्येष्ठ गायिका गंगुबाई हनगल आणि बुजुर्ग गायक पं. फिरोज दस्तूर यांनी या महोत्सवात गुरुसेवा बजावली आहे. गायन, वादन आणि नृत्य अशा त्रिवेणी संगमाने नटलेल्या या महोत्सवात संगीत क्षेत्रातील विविध घराण्यांचे गायक, वादक आणि नृत्यकलाकार आपल्या आविष्काराने रसिकांना मंत्रमुग्ध करतात.
रात्री दहानंतर धनिवर्धक सुरू ठेवण्यास असलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांपासून सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे स्वरूप बदलले आहे. अभिजात संगीतावर प्रेम करणाऱ्या रसिकांनी महोत्सवाच्या या स्वरूपावर आणि कलाकारांना ऐकण्यासाठी आवर्जून उपस्थित राहण्याचे व्रत जोपासले असल्याने महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो.