पुणे : ‘वाहतूक कोंडी असलेल्या शहरांमध्ये पुणे अव्वल स्थानी आहे. वाढलेल्या वाहन संख्येमुळे प्रदूषणात वाढ झाली असून त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. देशात वर्षाला २१ लाख, तर पुण्यात साडेतीन हजार नागरिकांना हवेच्या प्रदूषणापासून होणाऱ्या आजाराचा सामना करावा लागत आहे, असे मत ‘परिसर’ संस्थेचे कार्यकारी संचालक आणि वाहतूक अभ्यासक रणजित गाडगीळ यांनी व्यक्त केले. ‘रस्ते अपघातात देशभरात वर्षाला एक लाख ७० हजार लोकांचा जीव जातो. तर पाच लाख लोकांना गंभीर दुखापत होते. पुण्यात दररोज एका व्यक्तीचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू होतो,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.
वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित ‘वसंत व्याख्यानमाले’मध्ये ‘शहर वाहतूक-आव्हाने आणि पुढील मार्ग’ या विषयावर रणजित गाडगीळ यांचे व्याख्यान झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. गाडगीळ म्हणाले, ‘रस्ते, उड्डाणपूल बांधून वाहतूककोंडी सोडविणे म्हणजे पेट्रोल टाकून आग विझविण्यासारखे आहे. पायाभूत सुविधा वाढल्यानंतर वाहनांची संख्या वाढते. त्यामुळे उड्डाणपूल बांधून आणि रस्ते वाढवून वाहतूककोंडी सुटत नाही, तर ती वाढत जाते. वाहतूक कोंडी हा प्रश्न तांत्रिक नसून, सामाजिक आहे. हा प्रश्न सोडवायचा असेल, तर शहराची वाहतूक रचना वाहनकेंद्री नव्हे तर, नागरिककेंद्री असणे महत्त्वाचे आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करून खासगी वाहनांची संख्या कमी करणे हा वाहतूक कोंडीवरचा उत्तम पर्याय आहे. रस्त्यांवरील वाहने कमी झाली की, बरेच प्रश्न सुटतात, याकडे गाडगीळ यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, ‘पुण्यामध्ये आतापर्यंत पीएमपी ही एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्था होती. मात्र, मागील चार वर्षांत पीएमपी बसची संख्या केवळ पन्नास बसने वाढली असून प्रवासी संख्येतही घट झाली आहे’, याकडे लक्ष वेधून गाडगीळ म्हणाले, ’एक लाख लोकसंख्येमागे ५० बस असे सक्षम सार्वजनिक वाहतुकीचे सूत्र आहे. मात्र, पुण्यात ही संख्या निम्म्याने कमी आहे. त्यामुळे लोक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यापासून परावृत्त होतात. परदेशात एका मोटारीला घर, कार्यालय आणि मॉल अशा तीन ठिकाणी वाहन लावण्याच्या जागा असतात. वाहन वापरू नये यासाठी काही करावे लागेल.
युरोपियन देशांमध्ये पार्किंगचे दर भरमसाट असतात. पुणे हे देशातील एकमेव शहर आहे, की जिथे लोक रस्त्यावर कोणत्याही वेळी विनाशुल्क गाडी लावतात. अशा गाड्यांमुळे रस्त्यांवरची जागा अडली जाते. परिणामी वाहतूक कोंडीत भर पडते.’ नागरिकांसाठी असलेला शहराचा मध्य भाग आता वाहनांचा झाला आहे. त्यामुळे या भागात पायी चालणेही कठीण झाले आहे. सायकलींचे शहर अशी ओळख असणारे पुणे आता जगातील प्रदूषित आणि वाहतूक कोंडीचे शहर म्हणून ओळखले जात आहे. हा चुकीच्या शहर नियोजनाचा फटका असल्याचे गाडगीळ यांनी सांगितले.
पुण्यात २००५ मध्ये वाहनांची संख्या आठ लाख होती. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे २०१५ मध्ये झालेल्या नोंदणीनुसार शहरातील वाहनांची संख्या २३ लाख इतकी होती. मात्र, २०२५ मध्ये नोंदणीकृत वाहनांची संख्या ४१ लाख इतकी झाली आहे. गेल्या दहा वर्षांत वाहनांच्या संख्येत दुपटीने झालेली वाढ ही शहरातील वाढलेले रस्ते आणि उड्डाणपुलाचा दुष्परिणाम आहे. रणजित गाडगीळ, वाहतूक अभ्यासक