पुणे : विकेंड किंवा अन्य सुट्टीच्या दिवशी पुणे आणि जिल्ह्यात पर्यटनासाठी येणा-या पर्यटकांची मोठी संख्या लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत सर्व पर्यटन स्थळे एका अॅपवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे शहरासह जिल्हयात किती पर्यटन स्थळे आहेत, ती कुठे आहेत, तेथे जाण्यासाठीच्या मार्गाबरोबरच कोठून आणि काय वाहन व्यवस्था आहे या माहितीबरोबरच तेथे जाण्यासाठीचा स्लॉट कोणते आहेत आणि पर्यटनस्थळावर प्रवेशासाठी किती शुल्क भरावे लागणार आहे, यांची इत्थंभूत माहिती लवकरच या ॲपवर मिळणार आहे.
मावळ तालुकयातील कुंडमळा येथील पुलावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने दुर्घटना घडली. यामध्ये काही पर्यटकांना जीव गमावावा लागला होता. यापूर्वी अशा अनेक घटना पुणे जिल्हयात असलेल्या पर्यटनस्थळांवर घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पर्यटनस्थळांवर सोई-सुविधा वाढविण्यांबरोबरच शुल्क आकारणे अशा विविध उपयोजना करण्यासाठी पर्यटन विकास आराखडा तयार केला आहेत. त्यामध्ये पर्यटकांच्या सोईसाठी ॲप विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
पुणे जिल्ह्यामध्ये निसर्गसंपन्न आहे. या जिल्हयात गड-किल्ले, धरणे, टेकड्या, गवताळ प्रदेश, लेणी, ऐतिहासिक वारसास्थळे असे पर्यटनाची अनेक ठिकाणे आहेत. तसेच या पर्यटनस्थळांना जोडणारी कनेटिव्हीटी देखील आहे. त्यामुळे राज्यातील पर्यटकांबरोबरच परराज्य आणि परदेशातून पर्यटनासाठी या जिल्हयात येणाऱ्यांची मोठी संख्या आहे.
मात्र ही ठिकाणे कुठे आहेत, तेथे जाण्यासाठी वाहन व्यवस्था कशी आणि कोणत्या स्वरूपाची आहे, ती सुविधा कोणत्या ठिकाणाहून आहे. त्या ठिकाणी निवास आणि खाण्यापिण्याची काय सुविधा आहेत, यांची एकत्रित माहिती पर्यटकांना उपलब्ध होत नाही. अनेकदा त्यांची फसवणूक झाल्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत.
पुणे जिल्ह्यातील १३८ पर्यटन स्थळे आहेत. त्या सर्व ठिकाणांची माहिती, त्यांची वैशिष्ट, त्या ठिकाणी असलेल्या स्पोर्ट्स सुविधांसह सर्व माहिती देणारे ॲप विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत त्याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण होईल आणि जानेवारी महिन्यापर्यंत ही सर्व माहिती अॅपवर असेल, असे डुडी यांनी सांगितले.
पर्यटनस्थळांवर एकाचवेळी पर्यटकांची गर्दी उसळू नये, तेथे येणाऱ्या पर्यटकांना सर्व सोई-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, ही स्थळे कुठे आहेत, त्यासाठी कनेटीव्हीटी काय उपलब्ध आहे, अशा सर्व गोष्टींची माहिती पर्यटकांना एकाच ठिकाणी मिळावी, यासाठी ॲप विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटन विकास आराखड्यात या सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी. पुणे.
या ॲपवर काय काय माहिती मिळणार
- पर्यटनस्थळे कुठे आहेत.
- तेथे जाण्यासाठी काय आणि कोणत्या सुविधा आहेत.
- पर्यटनस्थळाच्या परिसरात कोणकोणत्या सुविधा आहेत.
- पर्यटनस्थळाच्या ठिकाणी किती शुल्क आकारणी.
- शुल्क ऑनलाइन भरण्याची सुविधा.
- कोणकोणते स्लॉट आहेत.