Pune Traffic Changes for Ganeshotsav 2025 : गणेशोत्सवानिमित्त पुणे शहर पोलिसांनी शहराच्या मध्यवर्थी भागातील विविध रस्त्यांवर अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. वाहतूक पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी याबाबतची माहिती दिली आहे. गणेशोत्सवादरम्यान, या भागात मिरवणुका, गणेश दर्शनाच्या रांगा आणि भाविकांची वर्दळ असते. अवजड वाहनांमुळे या भागात मोठी वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अनेक वर्दळीच्या रस्त्यांवर अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली आहे.
हिंमत जाधव म्हणाले, “२५ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान, पुण्यातील शास्त्री रोड (सेनादत्त चौक ते अलका चौक), टिळक रोड (जेधे चौक ते अलका चौक), कुमठेकर रोड (अलका चौक परिसर), लक्ष्मी रोड (संत कबीर चौक ते अलका चौक), केळकर रोड (फुटका बुरुज ते अलका चौक), बाजीराव रोड (पुरम चौक ते गाडगीळ पुतळा), शिवाजी रोड (गाडगीळ पुतळा ते जेधे चौक), कर्वे रोड (नळ स्टॉप चौक ते खंडोजी बाबा चौक), एफसी रोड (खंडोजी बाबा चौक ते चाफेकर चौक), जे. एम. रोड (एस. जी. बर्वे चौक ते खंडोजी बाबा चौक), सिंहगड रोड (राजाराम पुल ते सावरकर चौक) आणि गणेश रोड (पॉवरहाउस ते फुटका बुरुज) या रस्त्यांवर अवजड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.
या रस्त्यांवर एरवी बरीच वाहतूक कोंडी होत असते. अशात गणेशोत्सवारदम्यान वर्दळ वाढल्याने आणखी समस्या निर्माण होतात. त्यातच अवजड वाहनांची वाहतूक चालू राहिली तर या भागातील वाहतूक व्यवस्था हाताळणं अवघड होऊन जातं. त्यामुळे वाहतूक विभागाने पुणेकरांच्या सोयीसाठी अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या भागातील वाहतूक पूर्णपणे बंद
पुण्याच्या मध्यवर्ती भागात २५ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट दरम्यान शिवाजी रस्त्यावरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगितलं की दर वर्षी श्रमिक भवन, कसबा पेठ पोलीस चौकी भागात ठिकठिकाणी गणेश मूर्तींच्या विक्रीसाठी स्टॉल्स उभे केले जातात. त्यामुळे शिवाजी रस्त्यावरील गाडगीळ पुतळा ते गोटीराम भैय्या चौक (मंडई) या भागात वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांना पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
सावरकर पुतळा ते समाधान भेळ, सिंहगड रस्ता, केशव नगर व मुंढवा येथील कुंभारवाड्यात गणेश मूर्ती विकल्या जातात. त्यामुळे या भागातील वाहतूक पर्यायी मार्गांवर वळवण्यात आली आहे. गणेश मूर्ती खरेदी करायला मध्यवर्ती भागात येणाऱ्यांसाठी तळ्यांच्या काठी, टिळक पूल ते भिडे पूल या रांगेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
पीएमपी बसमार्गात बदल
शिवाजीनगर बसस्थानकातून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस मार्गात बदल करण्यात आला आहे. शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस स. गो. बर्वे चौक (माॅडर्न कॅफे), जंगली महाराज रस्ता,डेक्कन जिमखाना, टिळक रस्तामार्गे स्वारगेटकडे जातील. महापालिका भवन परिसरातून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस जंगली महाराज रस्त्याने जातील.
पार्किंग व्यवस्था
- कामगार पुतळा ते छत्रपती शिवाजी पुतळा
- कामगार पुतळा चौक ते छत्रपती शिवाजी पुतळा
- संताजी घोरपडे पथ ते गाडगीळ पुतळा
- टिळक पूल ते भिडे पूल, नदीपात्रातील रस्ता
- मंडईतील वाहनतळ
- छत्रपती शिवाजी रस्त्यावरील शाहू चौक ते राष्ट्रभूषण चौक
वाहतुकीतील इतर बदल
शिवाजीनगर येथील डेंगळे पूल परिसरात गणेशमूर्ती विक्रेत्यांनी स्टाॅल थाटले आहेत. या भागातील वाहतूक व्यवस्थेत बुधवारी (२७ ऑगस्ट) बदल करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी रस्त्यावरील गाडगीळ पुतळा चौक ते मंडईतील गोटीराम भैय्या चौक हा मार्ग वाहतुकीस बंद असणार आहे. वाहनांनी संताजी घोरपडे पथ, कुंभारवेस चौक, मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौक याा मार्गाने जावे. जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी पुतळा चौक, खुडे चौकमार्गे कुंभारवाड्याकडे जाणाऱ्या वाहनांनी छत्रपती शिवाजी पुलावरुन डावीकडे वळून संताजी घोरपडे मार्गाने कुंभारवेसकडे जावे. सारसबाग परिसरातील स्वातंत्रवीर सावरकर पुतळा चौक ते समाधना भेळ केंद्र परिसरात सर्व प्रकारचे वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. वाहनचालकांनी मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझा, नीलायम चित्रपटगृहाजवळ वाहने लावावीत, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.
प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त बुधवारी (२७ ऑगस्ट) मध्य भागताील वाहतूक बदल करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. कसबा पेठेतील फडके हौद चौक ते जिजामाता चौक, फुटका बुरूज, अप्पा बळवंत चौक ते हुतात्मा चौक (बुधवार चौक), मोती चौक, मंगला चित्रपटगृहसमोरील रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. मुंढव्यातील केशवनगर परिसरात मूर्ती खरेदीसाठी भाविकांची गर्दी होते. या पार्श्वभूमीवर या भागात वाहतूक बदल करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक पर्याची मार्गाने जाणार आहे.