पुणे : पोलीस असल्याचे भासवून दोघांना २६ लाख ३० हजार १५६ रुपयांना लुटल्याच्या दोन घटना घडल्या. याप्रकरणी वारजे माळवाडी आणि अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वारजे माळवाडी येथील २६ वर्षीय तक्रारदाराला १७ ते १८ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत वेगवेगळ्या मोबाइलधारकांनी पोलीस असल्याची बतावणी केली.

तुमच्यावर गुन्हा दाखल झाला असून, अटक करण्याची भीती त्यांना दाखवली. तसेच अटक करायची नसेल, केवळ चौकशी करण्यासाठी म्हणून तक्रारदाराकडून ४ लाख ६५ हजार ६ रुपये घेतले. तक्रारदाराने पैसे दिल्यानंतर त्यांना समोरील व्यक्ती पोलीस नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे पुढील तपास करत आहेत.

दुसऱ्या घटनेत कर्वे पुतळ्याजवळ राहणाऱ्या ७६ वर्षीय ज्येष्ठ महिलेला संजय पिसेनामक व्यक्तीने मोबाइल नंबर आणि व्हॉट्सअपद्वारे पोलीस असल्याचे भासवले. तक्रारदार महिलेच्या आधार कार्डचा वापर करून आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्यांची २१ लाख ६५ हजार १५० रुपयांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार ८ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत घडला. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक माने पुढील तपास करत आहेत.