पुणे : मुंढवा भागात वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांच्या गाडीला मद्यपी मोटारचालकाने धडक दिली. अपघातात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. सुदैवाने या घटनेत जाधव यांना दुखापत झाली नाही. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी मद्यपी मोटारचालकाला अटक केली.

समदीप मनमोहन सिंग (वय ३०, रा. शुभ इवान सोसायटी, केशवनगर, मुंढवा, मूळ रा. हरयाणा) याला अटक करण्यात आली. पोलीस नाईक शरद पवार (वय ३८, रा. हिंद कॉलनी, भेकराईनगर, हडपसर) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंढव्यातील कुंभारवाडा परिसरात श्री गणेश मूर्ती खरेदीसाठी शुक्रवारी (१५ ऑगस्ट) गर्दी झाली होती. या भागाची पाहणी करण्यासाठी पोलीस उपायुक्त हिंमत जाधव सायंकाळी तेथे आले होते. पोलीस उपायुक्तांच्या गाडीवर तानाजी कोंढाळकर वाहनचालक होते, तसेच त्यांच्याबरोबर ऑपरेटर शरद पवार होते.

पाहणी करून पोलीस उपायुक्त जाधव रात्री सव्वादहाच्या सुमारास निघाले होते. त्या वेळी मद्यधुंद अवस्थेतील मोटारचालक समदीप सिंग भरधाव निघाला होता. मुंढव्याकडून केशवनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्याच्या मोटारीने जाधव यांच्या गाडीला धडक दिली. अपघातात पोलीस नाईक पवार यांच्या ओठ आणि दाताला दुखापत झाली. चालक कोंढाळकर यांचे डोके दरवाजावर आपटल्याने त्यांना मुका मार लागला. मोटारीच्या धडकेत गाडीचे नुकसान झाले. मोटारचालक सिंगबरोबर मनीषकुमार सुमनकुमार सिंग (वय २८, रा. शुभशगुन सोसायटी, जुना मुंढवा रस्ता, खराडी) होता.

जाधव यांनी त्वरित या घटनेची माहिती मुंढवा पोलिसांना दिली. पोलिसांनी मोटारचालक समदीप आणि सहप्रवासी मनीषकुमार यांना ताब्यात घेतले. दोघे जण मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.