पुणे : मांजामुळे तिघे जखमी झाल्याची घटना संक्रातीच्या दिवशी घडली. मांजामुळे दोन ज्येष्ठ नागरिकांसह १२ वर्षांची मुलगी जखमी झाली.

छत्रपत्री शिवाजी पुलावर दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिक जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. देवराम दत्तात्रय कामठे (वय ६७, सध्या रा. शिवाजीनगर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. दुचाकीस्वार कामठे मंगळवारी (१४ जानेवारी) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर गावठाण परिसरातून शनिवारवाड्याकडे निघाले होते. त्या वेळी अचानक मांजा समोर आला. दुचाकीस्वार कामठे यांनी प्रसंगावधान राखून मांजा हाताने बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मांजाचा फास अंगठ्याला बसला. फास घट्ट बसल्याने त्यांना दुखापत झाली. कामठे यांच्यावर प्रथमोपचार करुन त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले.

हेही वाचा – पिंपरी चिंचवड : “महानगरपालिकेत २०१७ ची पुनरावृत्ती होणार”, शंकर जगताप काय म्हणाले?

मांजामुळे आणखी दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली. जखमींमध्ये ज्येष्ठासह बारा वर्षीय मुलीचा समावेश आहेत. बबन दिवटे (वय ७०), वंदन देठे (वय १२) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. मांजामुळे दिवटे यांच्या पायाला जखम झाली. वंदनच्या जिभेला गंभीर दुखापत झाली. दोघांवर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा – शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा कधी? ऑनलाइन कामकाजासाठी प्रशासकीय मान्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संक्रातीच्या दिवशी पतंगबाजीसाठी नायलाॅन मांजाचा वापर करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले. नायलाॅन मांजा विक्रीवर न्यायालयाने बंदी घातली आहे. न्यायालयाचा आदेश धुडकावून छुप्या पद्धतीने मांजा विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. मांजाविक्री प्रकरणात पोलिसांनी गुन्हे दाखल केले.