पुणे : मोटारीच्या धडकेत दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना लोहगावमधील हवाई दलाच्या वसाहतीत घडली. या प्रकरणी मोटारचालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विदार्थ विपीन मावी (वय दोन) असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. याबाबत विदार्थचे वडील विपीन राजसिंग मावी (वय ३४, सध्या रा. हवाई दल वसाहत, लाेहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका महिलेविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विपीन मावी हे हवाई दलात अधिकारी आहेत. त्यांचा दोन वर्षांचा मुलगा विदार्थ गुरुवारी (११ सप्टेंबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास हवाई दल वसाहतीतील घरासमोर खेळत होता. त्या वेळी वसाहतीत राहणाऱ्या एका मोटारचालक महिलेने घरासमोर खेळणाऱ्या विदार्थला धडक दिली. अपघातात विदार्थ गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपाचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी मोटार चालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार धेंडे तपास करत आहेत.

राष्ट्रभूषण चौकात अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बळीराम साहेबराव चव्हाण (वय २१, रा. पांगरी, बदनापूर, जि. जालना) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत राम साहेबराव चव्हाण (वय २३) यांनी खडक पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार बळीराम छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरुन गुरुवारी (११ सप्टेंबर) पाहटे चारच्या सुमारास निघाला होता. खडकमाळ आळी परिसरातील राष्ट्रभूषण चौकात भरधाव मोटारीने दुचाकीस्वार बळीराम याला धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या बळीरामचा मृत्यू झाला. या प्रकरणी चारचाकी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक दाढे तपास करत आहेत.