पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. विद्यापीठाने सात वर्षांनंतर शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून परीक्षा शुल्कात २० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सध्या राज्यातील अतिवृृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांकडून या शुल्कवाढीला विरोध करण्यात येत आहे.
विद्यापीठाने केलेल्या शुल्कवाढीबाबत परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी परिपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत शैक्षणिक वर्ष २०१८ पासून परीक्षा शुल्कात दर दोन वर्षांनी १५ टक्के नैसर्गिक शुल्कवाढ होण्यास मान्यता देण्यात आली होती. मात्र, करोना प्रादुर्भाव आणि त्यानंतरची परिस्थिती या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून गेल्या सात वर्षांत कोणतीही शुल्कवाढ जाणीवपूर्वक करण्यात आलेली नाही. मात्र, शैक्षणिक वर्ष २०२३-२४ आणि २०२४-२५पासून पदवी, पदव्युत्तर स्तरावरील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर परीक्षा नियोजन, मूल्यमापन आणि निकाल प्रक्रियेतील रचनेमध्ये बदल झाले आहेत. त्या अनुषंगाने परीक्षा शुल्कात परिवर्तन होणे क्रमप्राप्त आहे, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
मागील काळात प्रलंबित किमान थेट ५५ टक्के शुल्कवाढीऐवजी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून केवळ २० टक्के शुल्कवाढीचा निर्णय विद्यापीठ अधिकार मंडळांनी घेतला आहे. त्यानुसार शुल्क आकारण्याबाबत संलग्नित महाविद्यालये, परिसंस्थांनी योग्य ती कार्यवाही करावी, असे डॉ. देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत परीक्षा विभागाने परीक्षा शुल्कात वाढ केली आहे. विद्यापीठाने तत्काळ शुल्कवाढ रद्द न केल्यास आंदोलन करण्यात येईल. – राहुल ससाणे, अध्यक्ष, विद्यापीठ विद्यार्थी कृती संघर्ष समिती