पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर घेतलेल्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या निकालाबाबत शंका असल्यास विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत मिळाल्यानंतर संबंधित महाविद्यालयामार्फत पुनर्मूल्यांकन करून घेण्याच्या सूचना विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दिल्या आहेत. पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचा दुवा उपलब्ध करण्यात आला आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ११ जून आहे.

विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये पदवीच्या प्रथम वर्षाची परीक्षा संबंधित महाविद्यालयांकडून घेतली जाते. परीक्षेनंतर विद्यार्थ्यांचे गुण विद्यापीठाकडे पाठवले जातात. त्यानंतर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून निकाल जाहीर केला जातो. सध्या उन्हाळी परीक्षांचे निकाल जाहीर करून विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आले आहेत. निकालाविषयी शंका असलेल्या विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेची झेरॉक्स मिळवून पुनर्मूल्यांकन अथवा गुण पडताळणीसाठी अर्ज करावा. यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयाकडून हवी असलेली उत्तरपत्रिका मिळवावी. त्यामुळे महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना छायांकित प्रत उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही विद्यापीठाने दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालये संबंधित विद्यार्थ्यांचे गुण विद्यापीठाच्या ऑनलाइन प्रणालीत भरतील. त्यानंतर विद्यापीठाकडून पुनर्मूल्यांकनानंतरचे अंतिम निकाल जाहीर केले जाणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी दिली.