पुणे : दर वर्षी मे महिन्यात वाढते तापमान, नागरीकरणामुळे निर्माण होणारी उष्णतेची नागरी बेटे (अर्बन हिट आयलंड्स) यांची चर्चा असते. मात्र, यंदाचा मे महिना त्याला अपवाद ठरला असून, कमाल तापमान (लोएस्ट मॅक्झिमम टेम्परेचर) किमान नोंदले गेल्याचा विक्रम झाला आहे. यंदा २४ मे रोजी नोंदवले गेलेले २६.६ अंश सेल्सिअस हे तापमान १९६९ पासूनचे दुसऱ्या क्रमांकाचे ‘किमान’ कमाल तापमान ठरले आहे.

यंदाचा मे महिना गेल्या काही वर्षांपेक्षा वेगळा ठरला आहे. एप्रिलमध्ये कमाल तापमानाचे नवे विक्रम नोंदवले गेले होते. त्यामुळे मे महिनाही कडक उन्हाळ्याचा असेल, असे वाटत होते. मात्र, पाच मेपासूनच हवामानात झपाट्याने बदल झाले. परिणामी, कमाल तापमानाचे आकडे कमी होत गेले. स्थानिक परिस्थितीसह अरबी समुद्रातून येणारे आर्द्रतायुक्त वारे, कमी दाबाचे क्षेत्र अशा कारणांनी शहर आणि परिसरात जोरदार पाऊस पडू लागल्याने ऐन मे महिन्यातच पावसाळा जाणवू लागला. त्यामुळे कमाल तापमानाऐवजी पावसाचे विक्रम नोंदवले गेले.

हवामान विभागाकडे ‘किमान’ कमाल तापमानाची १९६९पासूनची आकडेवारी उपलब्ध आहे. त्यानुसार, शिवाजीनगर येथे मे महिन्यातील ‘किमान’ कमाल तापमान १९ मे २००० रोजी २५.८ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले होते. त्यामुळे यंदा २४ मे रोजी नोंदवले गेलेले २६.६ अंश सेल्सिअस हे तापमान द्वितीय क्रमांकाचे ठरले आहे. तसेच, महिनाभरात तीन वेळा कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदवले गेले आहे.

यंदा मे महिन्यातील बहुतांश दिवस तापमान ढगाळ आणि वातावरण पावसाळी होते. ढगाळ वातावरणामुळे सूर्यकिरणे जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे तापमान कमी होते – एस. डी. सानप, शास्त्रज्ञ, भारतीय हवामानशास्त्र विभाग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मे मधील ‘किमान’ कमाल तापमानाचे दिवस (अंश सेल्सिअसमध्ये)

२२ मे : २९.६
२५ मे : २८
२४ मे : २६.६