फोनवरून शिवीगाळ केल्याच्या शुल्लक वादातून दोन तरुणांना जीव गमवावा लागल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. फोनवर शिवीगाळ केली म्हणून दोन तरुण जाब विचारण्यासाठी गेले. त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. डोक्यात दगड घालून त्यांची हत्या करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात ही घटना घडली. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, आठही आरोपी फरार आहेत.
शिवम संतोष शितकल (वय २३) आणि गणेश रमेश माखर (वय २३ ) अशी हत्या करण्यात आलेल्या तरुणांची नावं आहेत. हे दोघेही पुणे जिल्ह्यात असलेल्या दौंड तालुक्यातील पाटस येथील रहिवाशी आहेत. फोनवरुन शिवीगाळ का केली म्हणून जाब विचारण्यासाठी ते गेले होते. दौंड तालुक्यातील पाटस येथील तामखंडा येथील भानोबा मंदिरासमोर रविवारी रात्री ही घटना घडली. इथे आलेल्या शिवम शितकल आणि गणेश माखर दोघांवर आठ जणांनी प्राणघातक हल्ला केला. यावेळी डोक्यात दगड घालून त्यांची निघृर्णपणे हत्या करण्यात आली.
हेही वाचा- पिंपरी चिंचवडमध्ये गुंडांची दहशत! दिसेल त्याच्यावर केले कोयत्याने वार
या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या घटनेतील सर्व आरोपी फरार झाले आहेत. या घटनेमुळे रात्रीपासून पाटस गावामध्ये तणावाचे वातावरण आहे. या प्रकरणी मन्या उर्फ महेश संजय भागवत, मोहन टुले योगेश शिंदे आणि इतर पाच अनोळखी युवकांवर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी केली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर पाटस गावामध्ये रात्रीपासून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
