पुणे : पुणे-सोलापूर रस्त्यावरील ऊरळी कांचन भागात मृतावस्थेत सापडलेल्या एका २० वर्षांच्या तरुणीचा खून प्रकरणाचा छडा लावण्यात ग्रामीण पोेलिसांना यश आले. १४ ऑक्टोबर रोजी तरुणीचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. निर्जन वाटेवरून घरी निघालेल्या तरुणीला गाठून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. तरुणीने आरोपीला विरोध केल्यानंतर तिच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले असून, पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली आहे.
दिनेश संजय पाटोळे (वय २६, रा. गोळे वस्ती, ऊरळी कांचन, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. १४ ऑक्टोबर रोजी ऊरळी कांचन भागातील नायगाव रस्त्यावर २० वर्षांची तरुण मृतावस्थेत सापडली होती. या घटनेची माहिती मिळताच ऊरळी कांचन पोलीस आणि ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलिसांना पिशवी (सॅक) सापडली होती. तरुणीच्या डोक्याला जखम झाली होती. शवविच्छेदनात तरुणीच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार केल्याने तिचा खून झाल्याचे उघडकीस आले होते. पोलिसांनी तरुणीची ओळख पटविली. तेव्हा तरुणी ऊरळी कांचनमधील असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तरुणीच्या भावाने याबाबत पोलिसांकडे फिर्याद दिली होती.
संवेदनशील गुन्हा असल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चार पथके तयार केली होती. पोलिसांनी परिसरातील ७० ते ८० ठिकाणी असलेले सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते. तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी जवळपास २०० ते २५० नागरिकांकडे चौकशी केली. १४ ऑक्टोबर रोजी नायगाव रस्त्याने एक संशयित दुचाकीवरून निघाला होता. चित्रीकरणात संशयित दुचाकीस्वार आढळून आला होता. पोलिसांनी संशयित दुचाकीस्वार दिनेश पाटोळेला ताब्यात घेतले. पाटोळेने रस्त्याने एकट्या निघालेल्या तरुणीला अडवून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला होता. तिने विरोध केल्यानंतर डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली पाटोळेने पोलिसांना दिली.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, ऊरळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर बाजिगरे, दत्ताजीराव मोहिते, उपनिरीक्षक अमित सिदपाटील, ईश्वर जाधव, सचिन घाडगे, आसिफ शेख, अतुल डेरे यांनी ही कामगिरी केली.
