पिंपरी- चिंचवड : भावकितील मुलीला शाळेतून घरी सोडवल्याचा राग मनात धरून एकावर पिस्तूलातून गोळ्या झाडण्यात आल्या. ही घटना पुण्याच्या वडगाव मावळमध्ये घडली आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अक्षय एकनाथ मोहितेवर दोन गोळ्या झाडण्यात आल्या. सुदैवाने तो या घटनेत थोडक्यात बचावला आहे.

याप्रकरणी सौरभ रोहिदास वाघमारे, अभिजित राजाराम ओव्हाळ, रणजित बाळासाहेब ओव्हाळ आणि प्रथमेश दिवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी, तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सविस्तर माहिती अशी की, अक्षय एकनाथ मोहिते याचा चुलत भाऊ हा वडगाव मावळमधील इंग्लिश स्कुलमध्ये इयत्ता दहावीत शिक्षण घेतो. त्याच शाळेत आरोपी अभिजित ओव्हाळ आणि रणजित बाळासाहेब ओव्हाळ यांच्या भावकीतील मुलीही शिक्षण घेतात. त्यांना अक्षयच्या चुलत भावाने शाळेतून घरी सोडले. याच रागातून मित्रांसोबत बसलेल्या अक्षयवर वेगवेगळ्या दोन दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी भर एकविरा चौकात गोळीबार केला.

सुदैवाने अक्षयला गोळी लागली नाही. त्याच्या दिशेने दोन गोळ्या झाडण्यात आल्या. पैकी एक राउंड खाली पडला. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे. भर चौकात गोळीवर केल्याने एकप्रकारे वडगाव मावळ पोलीसांचा वचक नसल्याचे दिसून येत आहे. असं असलं तरी घटनेनंतर वडगाव मावळ पोलिसांनी चार पैकी तीन आरोपींना काही तासातच बेड्या ठोकल्या आहेत, आता अधिक तपास पोलीस करत आहेत.