पुणे – मतदानाबद्दल शहरी नागरिकांमध्ये असलेली उदासीनता आणि त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेऊन पुण्यातील मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी विविध संघटनांनी पुढाकार घेतला असून त्यासाठी पुणेकरांना अनेक आकर्षक सवलती देखील जाहीर केल्या आहेत.

पुणे नागरिक मंच, क्रेडाई, आर्ट ऑफ लिव्हिंग, पुणे हॉटेलर्स असोससिएशन, पुणे रेस्टॉरेंटर्स अँड हॉटेलर्स असोसिएशन, पेट्रोल डिलर्स असोसिएशन, पुणे जिल्हा गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघ या संस्थांनी मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी पुढाकार घेऊन पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी पुणे नागरिक मंचाचे विशाल नलकरे, रोहित नऱ्हा, समीर खरे, पुणे जिल्हा गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघाचे सुहास पटवर्धन, पेट्रोल डिलर्स असोसिएशन पुणेचे अध्यक्ष ध्रुव रूपारेल, आर्ट ऑफ लिव्हींगचे राजे शास्त्रे, पुणे रेस्टॉरेंटर्स अँड हॉटेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी, पुणे हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष अमितकुमार शर्मा, क्रेडाईचे अध्यक्ष रणजित नाईकनवरे यांनी मतदार जागृतीविषयी आपापल्या संघटनांची भूमिका मांडली.

हेही वाचा – खडकवासला मतदारसंघात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा, वारजे भागात विनापरवानगी सभेचे आयोजन

यावेळी बोलताना पुणे नागरिक मंचाचे विशाल नलकरे म्हणाले की, पुणे शहर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर असून अलिकडच्या काळात शहरात मतदानाविषयी उदासीनता वाढत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्यात येणार आहेत. आमच्या या अभियानात ज्येष्ठ नागरिक संघ, महिला मंडळ, हास्य क्लब आणि गृहनिर्माण संस्था देखील जोडल्या गेल्या आहेत.

यावेळी बोलताना पुणे जिल्हा गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघाचे सुहास पटवर्धन म्हणाले की, गृह सहकारी संस्थांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे मतदान वाढण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सोसायटी पातळ्यांवर सहकार मित्र नेमण्यात आले असून समाज माध्यमांचाही उपयोग करून घेतला जात आहे.

हेही वाचा – नेता कोणाला म्हणायचे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी पेट्रोल डिलर्स असोसिएशन पुणेचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल म्हणाले की, आम्ही २० नोव्हेंबरला मतदानाच्या तारखेला इंजिन ऑइल खरेदीवर ५० रुपयांचे पेट्रोल मोफत देऊ. यावेळी बोलताना पुणे रेस्टॉरेंटर्स अँड हॉटेलर्स असोसिएशनचे गणेश शेट्टी म्हणाले की, लोकशाहीच्या या सगळ्यात मोठ्या उत्सवात सहभागी होऊन मतदानाचे कर्तव्य बजावलेल्या व्यक्तींना हॉटेलमध्ये १० टक्के सवलत देण्यात येणार आहे.

या सर्व संस्था- संघटनांतर्फे मतदानाच्या विविध ठिकाणी सेल्फी पॉईंट तयार करण्यात येणार आहेत. तसेच सोसायटी पातळीवर वॉर रूम उभारण्यात येणार असून पोस्टर स्पर्धा देखील घेण्यात येणार आहे. लोकशाहीच्या या सगळ्यात मोठ्या उत्सवात पुणेकर नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.