पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर हरकती, सूचना नोंदविणाऱ्यांमध्ये सत्ताधारी भाजपच्या कार्यकर्त्यांचा समावेश अधिक असल्याचे सुनावणीदरम्यान दिसून आले.
कसबा विधानसभा मतदारसंघातील एका प्रभागाचे तीन तुकडे केल्याने येथील आरक्षण धाेक्यात आल्याचा दावा सुनावणीमध्ये काही कार्यकर्त्यांनी केला. दरम्यान पहिल्या दिवशीच्या सुनावणीमध्ये २ हजार ९२० इतक्या हरकती, सूचना सुनावणीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. त्यासाठी सुमारे ५४० हरकतदारांनी उपस्थिती लावली.
महापालिकेने तयार केलेल्या प्रारूप प्रभागरचनांवर घेण्यात आलेल्या हरकतींवर सुनावणी घेतली जात आहे. दोन दिवस ही सुनावणी चालणार आहे. प्रभाग क्रमांक एक ते २९ या प्रभागांमधील हरकतींवर सुनावणी घेण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर सचिव व्ही. राधा यांनी ही सुनावणी घेतली. महापालिका आयुक्त नवल किशाेर राम, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद काटकर यावेळी उपस्थित होते.
प्रभागरचना करताना भौगोलिक तसेच नैसर्गिक सीमारेषा बदलण्यात आल्या आहेत. काही प्रभागांमध्ये आरक्षण बदलण्यासाठी सोयीस्करपणे लोकसंख्येचे विभाजन केले गेले आहे, असा आरोप सुनावणीमध्ये करण्यात आला. प्रशासनाने गेल्या अनेक वर्षांपासून असलेले आरक्षण बदलावे, यासाठी प्रभाग क्रमांक २४ कमला नेहरू हॉस्पिटल – रास्ता पेठचे तीन तुकडे केल्याचा आरोप करण्यात आला. हरकतींवर सुनावणी होत असताना सर्वपक्षीय कार्यकत्यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा, अशा घोषणा दिल्या. या प्रकारामुळे काही काळ सुनावणीच्या ठिकाणी गोंधळाचे वातावरण झाले.
सुनावणीचा पहिला दिवस सुरळीत पार पडल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. उर्वरित प्रभागातील हरकती, सूचनांवर जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार सुनावणी होणार असल्याचे उपायुक्त काटकर यांनी सांगितले.
दरम्यान, पुणे महापालिकेच्या वतीने गुरुवारी घेण्यात आलेल्या प्रभागांच्या सुनावणीसाठी २ हजार ९२० हरकती आल्या होत्या. त्यापैकी प्रत्यक्षात ५४० हरकतधारकांनी सुनावणीसाठी हजेरी लावली. यामध्ये प्रभाग क्रमांक २४ कमला नेहरू हॉस्पिटल-रास्ता पेठचे सर्वाधिक म्हणजे ८५ हरकती नोंदविणारे उपस्थित होते.
‘आपला कसबा कुठंय?’
बालगंधर्व रंगमंदिर येथे सुरू असलेल्या प्रभागांच्या हरकतींच्या सुनावणीच्या वेळी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचे पुत्र प्रणव धंगेकर यांनी ‘आपला कसबा कुठंय?’ असा फलक सभागृहात झळकावत भावना व्यक्त केल्या. प्रभागरचना करताना राजकीय द्वेष भावनेतून चुकीच्या पद्धतीने आणि नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कसबा हा पारंपरिक प्रभाग आहे. यापूर्वी झालेल्या निवडणुकांत कसब्याचे अस्तित्व कायम होते. मात्र, या नवीन प्रभागरचनेमध्ये कसब्याचे नावदेखील गायब करण्यात आले आहे. यामागे राजकीय षडयंत्र आहे, अशी भावना अधिकाऱ्यांसमोर प्रणव धंगेकर यांनी व्यक्त केली.